भिकार व्यवस्थेला त्रास देणारे प्रश्न विचारणार, सुव्रत जोशीने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:21 PM2021-04-30T17:21:01+5:302021-04-30T17:35:16+5:30

हा देश इतके तडाखे खाऊनही का टिकून आहे याचा प्रत्यय यातून येत आहे.ही परिस्थिती काहीशी जखमेवर फुंकर घालणारी आहे. 

Suvrat Joshi Expresses his rage through various platforms, urges people to ask authorities | भिकार व्यवस्थेला त्रास देणारे प्रश्न विचारणार, सुव्रत जोशीने व्यक्त केला संताप

भिकार व्यवस्थेला त्रास देणारे प्रश्न विचारणार, सुव्रत जोशीने व्यक्त केला संताप

googlenewsNext

आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्थान निर्माण करणारा अभिनेता सुव्रत जोशीने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत राजकाणावर संताप व्यक्त केला आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. कोरोना काळातही सुरु असलेल्या राजकाणावर त्याने तीव्र शब्दांत टीका केली आहे. इतर कलाकरांप्रमाणे सुव्रत देखील विविध मुद्यांवर सोशल मीडियावर आपले मत मांडताना दिसतो.  पुन्हा एकदा त्याने निर्भीड मत माडंले आहे. यावर चाहते देखील त्याच्या मताशी सहमत असून त्याच्या या पोस्टला पसंती देत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

सुव्रतने पोस्ट शेअर करत म्हटले की, बरेच जण आताच्या काळात कळकळीने,स्वतःचे राजकीय हेतू ,विचारसरणी सोडून मनापासून माणुसकीच्या नात्याने एकमेकाना मदत करत आहेत. हा देश इतके तडाखे खाऊनही का टिकून आहे याचा प्रत्यय यातून येत आहे.ही परिस्थिती काहीशी जखमेवर फुंकर घालणारी आहे. 

बरेच जण आताच्या काळात कळकळीने,स्वतःचे राजकीय हेतू ,विचारसरणी सोडून मनापासून माणुसकीच्या नात्याने एकमेकाना मदत करत आहेत....

Posted by Suvrat Laxman Joshi on Friday, 30 April 2021

यात एक वर्ग मात्र व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्याना, सत्तेतील हलगर्जीपणावर बोट ठेवणाऱ्याना "तुम्ही कसे नकारात्मक वातावरण तयार करत आहात?" "be positive" वगैरे सल्ले देताना दिसत आहेत. ह्या व्यक्ती बहुत करून शहरी आणि "आहे रे' स्तरातील आहेत,म्हणजे प्रश्न न विचारण्याचा सल्ला देणाऱ्या. हे  असले सल्ले मला भयानक बेजबाबदारपणाचे आणि सोयीस्कर वाटतात. 

प्रश्न विचारणारे लोक हे काहीच कृती करीत नाहीत असे एक अत्यंत ढोबळ गृहीतक यात धरले गेले आहे. गेल्या अनेक वर्षात भारतीय जनमानसात "पॉप्युलर नरेटिव्हस" नी रूढ केलेल्या विचारवंतांच्या,विवेकाच्या विरोधात राजकीय फायद्यासाठी जे वातावरण घडवून आणले त्याचा हा परिणाम आहे. जसे पोलीस म्हणजे ज्यांची भीती वाटावी,किंवा जे आपल्याला त्रास देतात असा कुणी माणूस आहे अशी एक धारणा हिंदी चित्रपटांनी करून ठेवली होती. प्रत्यक्ष पोलीस खात्यातील लोकांबरोबर ज्याने वेळ व्यतीत केला आहे त्याला हे किती अर्धसत्य आहे हे लगेच कळून येईल.असो.  त्याचप्रमाणे जे विचार करतात,प्रश्न विचारतात ते कृती करत नाहीत असा एक घोर गैरसमज आपल्या समाजाने रूढ केला आहे. किंबहुना माझा अनुभव अगदी विपरीत आहे. खरे काम करणारे आसपासची भ्रष्ट व्यवस्था पाहून व्यथित होतात आणि त्यातूनच योग्य ते सडेतोड प्रश्न विचारू लागतात. 

मला नाटकामुळे, अभिनयामुळे सत्यशोधन आणि करुणा संवर्धन ही मूल्ये आयुष्यात लाभली. त्यामुळे त्यातल्या त्यात किमान सत्याचा शोध घेणे आणि ते मिळाले की निर्भयपणे ते मांडणे हे मला माझे कामच वाटते. माझ्या मर्यादित क्षमतेमध्ये "सत्य काय"वगैरे मोठ्या प्रश्नांची उत्तरे देणे मला शक्य नाही. ती मिळाल्याचा माझा दावाही नाही. पण बुद्ध म्हणतो तसे ते प्रखर असते आणि ते कटूही असते. त्यामुळे डोळे मिटून दूध पिणाऱ्याअनेकांच्या डोळ्याला ते खुपणार आणि असत्य वचने बोलणाऱ्यांचे तोंड ते ऐकून कडू होणार हे स्वाभाविक आहे. पण तरी ते करावे तर लागेल. 

अध्यात्माचे स्पा, कॉर्पोरेट स्ट्रेस बस्टर चे cult, postivity आणि Spiritual well being चे जे बाजार मांडले आहेत त्यातून पसरवल्या गेलेल्या गैरसमजुतीमुळे सत्याच्या प्रखरतेचा आणि कटूपणाचा आपल्याला विसर पडला आहे. सत्य कितीही त्रासदायक असले तरी बोलले गेले पाहिजे. ते बोलून आपला तोटा होईल आणि कदाचित ऐकणारा अस्वस्थ होईल.ह्याला आपण "निगेटिव्हीटी" कसे म्हणणार?

 आता मी आणि आपल्यासारखे अनेक जण सध्या  आपल्याकडे असलेल्या सर्व शक्तीनिशी एकेक प्राण वाचवण्यासाठी आपापल्या परीने पराकाष्टा करत आहोत. ती करायलाच हवी. मी स्वतः गेल्या आठवड्यात रोज तीन ते चार माणसांना वैयक्तिक पातळीवर बेड,ऑक्सिजन,प्लासमा मिळवून द्यायला धडपडतो आहे. आणि दर दोन दिवसांनी ती व्यक्ती मदती अभावी गेल्याचे कळत आहे. सांत्वना पालिकडचा हा हाहाकार आहे आणि प्रत्येक मृत्यूच्या बातमी मागे केंद्रापासून ते स्थानिक पातळीवर राजकीय व्यवस्थेचा ढिसाळपणा, बेजबाबदार पणा प्रकर्षाने समोर येत आहे. (काही सन्माननीय अपवाद वगळता,यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर प्रशासकीय सेवेत रुजू लोक जसे पोलीस, सफाई कर्मचारी वगैरे यांना सलाम!) 

सध्याची परिस्तिथी ही देखील निवडणूकांचे प्रचार आणि मते मिळवण्यासाठी केलेल्या बेजबाबदार कृती,धार्मिक मेळावे यातून अधिक दुर्दैवी झाली आहे आणि यावर मुजोरी म्हणून दडपशाही असे सर्व बाजूनी प्रहार ही व्यवस्था सामान्य जनतेवर होत आहेत . अश्या वेळी दोन हातांनी मदत करणे आणि बुद्धी ताळ्यावर ठेवून  निर्भीड वाणीने या सगळ्या भीषण प्रकाराला जबाबदार व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे आपले कर्तव्य आहे. हे किंवा ते असा पर्याय आता आपल्याकडे नाही. मदत केलीच पाहिजे ती आपण करताच आहोत. पण यावेळी जळजळीत प्रश्न विचारणे हेही मदत करणेच आहे. ज्यांच्या हातात दोन जन्मदात्यांची प्रेते आहेत,लॉक डाऊन ने ज्यांचे व्यवसाय बंद पाडले अशा " नाही रे' स्तरातल्या लोकांनी कुणाकडे जायचे? त्यांच्यासाठी का होईना हे सत्यशोधन व्हायला हवे.  त्यांचा आवाज होणे इतपत तरी आपण आपले आत्मे जागृत ठेवायला हवेत.

आत्ता आपल्या हातात असलेली सर्व आयुधे ही हे पुन्हा कधीच घडणार नाही यासाठी देखील वापरली गेली पाहिजेत. अन्यथा माझे घर जळत नाही म्हणून मी गप्प असा अक्षम्य स्वार्थीपणा ठरेल. मी तरी माझ्या सर्व शक्ती निशी माझ्या बांधवाना मदत करणार आणि लोकांप्रति काहीही बांधिलकी ना दाखवणाऱ्या या भिकार व्यवस्थेला त्रास देणारे प्रश्न विचारणार. एक भारतीय म्हणून मला हे माझे इति कर्तव्य वाटते. जय हिंद. स्टे सेफ.

Web Title: Suvrat Joshi Expresses his rage through various platforms, urges people to ask authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.