सुबोध भावेने वाढदिवसाला केली मोठी घोषणा; महाराष्ट्रातील संस्थांना देणार २५ महिन्यांसाठी नियमित आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:51 IST2025-11-11T09:49:52+5:302025-11-11T09:51:11+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस आणि अभिनय क्षेत्रातील २५ वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा केला.

सुबोध भावेने वाढदिवसाला केली मोठी घोषणा; महाराष्ट्रातील संस्थांना देणार २५ महिन्यांसाठी नियमित आर्थिक मदत
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस आणि अभिनय क्षेत्रातील २५ वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा केला. या संस्मरणीय सोहळ्यात सुबोधने एक मोठी सामाजिक जबाबदारी उचलण्याची घोषणा केली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याचे कौतुक होत आहे.
सुबोध भावेने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत कालचा दिवस कसा अविस्मरणीय ठरला, हे सांगितले. यावेळी त्याने काही फोटो शेअर करत लिहिले की, काल माझा ५०वा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला २५ वर्षांचा प्रवास एकत्र साजरा केला. अर्थात माझे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व माध्यमातील माझे निर्माते, दिग्दर्शक,लेखक, माझे सहकलाकार, पडद्यावरील व पडद्यामागील.ज्यांच्यामुळे मी घडतोय ते सर्व उपस्थित होते. त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ति ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ते ही उपस्थित होते.
त्याने पुढे म्हटले की, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जी, माझे जेष्ठ दिग्दर्शक गोविंद नीहलानी, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, मा.उद्धव ठाकरे साहेब, मा.राज ठाकरे साहेब, खासदार नरेश म्हस्के, सचिन जी, जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी,अनेक पोलिस अधिकारी,न्यूज माध्यमातील अनेक मित्र. कालचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर प्रेम करणार्या तुम्हा सर्वांचेही मनःपूर्वक आभार . तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण सर्वांना वैयक्तिक रीत्या त्याची पोचपावती देणे शक्य होत नाहिये. म्हणून या माध्यामातून तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे.
'मदत' जाहीर करत चाहत्यांना केले आवाहन
या खास निमित्ताने सुबोध भावेने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. तो म्हणाला, खरंतर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते. पण या वेळेस मुद्दाम करतोय. गेली काही वर्षं करतच होतो, पण आता जे ठरवलय ते जाहीर करावसं वाटतय कारण त्या मुळे ज्या संस्थांसाठी आणि मुख्य म्हणजे माणसांसाठी करतोय त्यांना त्याचा फायदा व्हावा. २५ वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करतोय. पण आता त्याचा विस्तार करावासा वाटला. असं ठरवलं की २५ वर्ष मला काम करून झाली त्यामुळे पुढचे २५ महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार्या सामाजिक संस्थाना आर्थिक सहाय्य करावे. त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिनानिमित्त बीड जिल्ह्यात अनाथ मुलांसाठी काम करणार्या शांतीवन या संस्थेच्या नागरगोजे सर यांना सांस्कृतिक मंत्री आशिष जी शेलार यांच्या उपस्थितीत पहिला धनादेश दिला. आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील.
सुबोध भावेने शांतीवन संस्थेसाठी मदत करणाऱ्यांना आवाहन केले आहे की, तुम्हालाही सहाय्य करावसं वाटलं तर जरूर करा. शांतीवनसाठी आपण दिलेली मदत आयकर कायदा 80 G नुसार करमुक्त आहे. त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवण्यात येईल. www.shantiwan.org. चाहत्यांचे आभार मानत सुबोधने शेवटी म्हटले आहे, "आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे."