बाळू आणि चानीच्या माशाची गोष्ट 'पिप्सी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 06:00 IST2018-07-26T16:01:08+5:302018-07-27T06:00:00+5:30

बालविश्व म्हणजे निरागसता, निष्कपट मन आणि चिमुकल्या डोळ्यात दिसणारा प्रगाढ विश्वास. 'राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा माणसाचा माश्यात.'

The story of Baloo and Chani fish 'Peepsi' | बाळू आणि चानीच्या माशाची गोष्ट 'पिप्सी' 

बाळू आणि चानीच्या माशाची गोष्ट 'पिप्सी' 

ठळक मुद्दे'पिप्सी' या सिनेमातील बाळू आणि चानी या दोन निरागस जीवांची सफर यात दाखविली आहेही गोष्ट चानी व बाळूच्या मैत्रीवर आधारित आहे

बालविश्व म्हणजे निरागसता, निष्कपट मन आणि चिमुकल्या डोळ्यात दिसणारा प्रगाढ विश्वास. 'राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा माणसाचा माश्यात.' या परीकल्पनेवर असाच विश्वास ठेवणाऱ्या 'पिप्सी' या सिनेमातील बाळू आणि चानी या दोन निरागस जीवांची सफर यात दाखविली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चित्रपटाची टीम लोकमत कार्यालयास भेट देण्यास आली. यावेळी चित्रपटाचे लेखक सौरभ भावे, निर्माती विधी कासलीवाल व दोन बालकलाकार साहिल जोशी व मैथिली पटवर्धन यांनी चित्रपटाचा प्रवास उलगडून सांगितला. 

विधी कासलीवाल सांगतात, 'आशा' आणि 'विश्वास' या दोन गोष्टी मनुष्याला जगण्याची ऊर्मी देतात. लहान मुलं अत्यंत निरागसतेने त्यांना समजलेल्या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवतात. 'पिप्सी' या सिनेमाचा प्रवास अशाच काहीशा विश्वासानिशी ३ वर्षांपूर्वी चालू झाला आणि त्याच विश्वासाने आम्ही हा विषय प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झालो आहोत. चित्रपटाच्या आशयाइतकंच महत्त्वाचं आहे आर्थिक बाजू लक्षात घेणं. जर एक चित्रपट यशस्वी झाला तरच पुढचे विषय तितक्या ताकदीने तयार करता येतात त्यामुळे या दोन्हींचा समतोल कसा साधायचा हे सतत लक्षात घेतलं पाहिजे.  

चित्रपटाचे लेखक सौरभ भावे सांगतात, की पूर्णपणे लहान मुलांच्या खांद्यावर चित्रपटाची जबाबदारी शक्यतो दिली जात नाही. त्यांना मोठ्या आणि नामवंत कलाकारांची साथ मिळताना दिसते किंवा एकतर कार्टून फिल्म्स प्रदर्शित होतात. या सिनेमात दोन लहान मुलांचं भावविश्व उलगडून सांगताना त्यांच्या ओठांत जड शब्द दिलेले नाहीत. संवाद खरोखरच लहान मुले बोलताहेत असं चित्रपट बघताना जाणवेल. 'मासा जगला तर आईचा जीव वाचेल हे खरं आहे का?' असा लहान मुलीला पडलेला प्रश्न आणि तिला मिळत जाणारी उत्तरं आणि  जिथे पिण्याचं पाणी मिळणं दुरापास्त आहे अशा भागात हा मासा ही मुले किती विश्वासाने जगवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

साहिल म्हणाला, चित्रपटात बाळूची भूमिका मी आणि चानीची भूमिका मैथिलीने साकारली आहे. चानीच्या आईला वाचविण्यासाठी आम्ही 'पिप्सी' हा मासा पाळतो. त्याचं नावही चानीच सुचवते आणि मग त्याला जिवंत ठेवण्याची आमची धडपड सुरु होते अशा आशयाचा हा चित्रपट आहे.

पडद्यावर कितीही शांत दिसली तरी मैथिली पटवर्धन तिच्या वयाला साजेश्या अवखळ स्वभावाची आहे. ती म्हणाली, पिप्सीची कथा ऐकली तेव्हाच मला फार आवडली. ही गोष्ट चानी व बाळूच्या मैत्रीवर आधारित आहे. विधी कासलीवाल सांगतात, चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन देशपांडे याने मुलांच्या वयाचे होऊन त्यांना सेटवर मार्गदर्शन केले. छोट्या छोट्या मजेशीर पैजा लावत, मजा मस्ती करत या दोघांसोबत सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. 'ता ना पि हि नि पा जा', 'गूज' ही चित्रपटातील गाणी मुलांच्या निरागस भावविश्वावर आधारित असून श्रवणीय आहेत. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

 

Web Title: The story of Baloo and Chani fish 'Peepsi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.