मराठी टक्का घसरल्याने उतरला साहित्य संघचा रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:58 AM2022-05-12T11:58:21+5:302022-05-12T11:59:12+5:30

Me Natyagruha Boltoy Part 4: लॅाकडाऊननंतर रंगला एकच प्रयोग; उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसेना

Special Article Me Natyagruha Boltoy Part 4 Marathi Sahitya Sangh Mandir | मराठी टक्का घसरल्याने उतरला साहित्य संघचा रंग

मराठी टक्का घसरल्याने उतरला साहित्य संघचा रंग

googlenewsNext

मी नाट्यगृह बोलतोय भाग - ४

संजय घावरे

एके काळी साहित्य आणि नाटकांचा संगम घडवत रसिकांचे मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणारे गिरगावातील साहित्य संघ मंदिर आज रसिकांच्या प्रतीक्षेत तिष्ठत उभे आहे. गिरगावातील मराठी माणूस हळूहळू हद्दपार झाल्याचा फटका साहित्य संघ मंदिरला बसला आहे. सरकारने नाट्यगृहांवरील निर्बंध हटविल्यानंतर साहित्य संघमध्ये व्यावसायिक नाटकाचा झालेला केवळ एकच प्रयोग याची साक्ष देण्यास पुरेसा आहे. इतर काही समस्यांच्या जोडीला गिरगावातील मराठी टक्का घसरल्याने साहित्य संघचा रंग उतरला असल्याचे नाट्यकर्मींचे म्हणणे आहे.

मुंबई मराठी साहित्य संघ मंदिरला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लोकांची पावले साहित्याच्या दिशेने वळावीत यासाठी त्या काळातील लोकांना मनोरंजन महत्त्वाचे वाटल्याने नाट्य आणि साहित्य अशा दोन शाखा सुरू केल्या होत्या. मात्र आजचे इथले वास्तव मनाला चटका लावणारे आहे. कोरोनाच्या काळात सर्वच नाट्यगृहे बंद होती, पण निर्बंध उठल्यानंतरही या नाट्यगृहात १ मे रोजी 'खरं खरं सांग' या एकाच व्यावसायिक नाटकाचा प्रयोग झाला. मधेमधे छोटे-छोटे प्रयोग होतात, पण व्यावसायिक नाटकाचा एकच प्रयोग झाला आहे. 'रायगडाला जेव्हा जाग येते' या मराठी नाटकासोबतच 'कथा एक कंस थी' या हिंदी नाटकाचाही प्रयोग झाला. गिरगावातून नाट्यप्रेमी मराठी माणूस हद्दपार झाल्याचा फटका साहित्य संघ मंदिरला बसला आहे. पार्किंगची फार मोठी समस्या या नाट्यगृहाला पूर्वीपासून भेडसावत आहे. नाटकांच्या सेटसचे मोठे ट्रक, नाटकवाल्यांची बस नेण्याचा मार्ग खूप चिंचोळा आहे. ट्रक-बस वळवून पुन्हा मागे न्यायला जागाच नाही. नाटक बघायला येणाऱ्या रसिकांनाही गाडी पार्क करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. इथला रंगमंच, वातानुकूलित यंत्रणा, आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत आहेत. साऊंड सिस्टीम जुनी असली तरी चांगली आहे. असे असूनही केवळ नाट्यरसिकांनीच नव्हे, तर निर्मात्यांनीही साहित्य संघ मंदिराकडे पाठ फिरवली आहे.

पूर्वी नाट्यगृह हे उत्पन्नाचे साधन आणि इतर सर्व खर्चाची साधने असा इथला कारभार होता. त्यामुळे नाट्यगृह अविरतपणे सुरू रहाणे किंवा सातत्याने नाटकांचे प्रयोग होणे गरजेचे होते. जवळपास सर्वच राजकीय पक्षांना सांगूनही कोणीही नाट्यगृहापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्याची दखल घेतली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. जोपर्यंत गाड्या आत येत नाहीत, तोपर्यंत प्रेक्षक येणार नाहीत. त्यामुळे सध्या साहित्य संघाची अवस्था वाईट आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसवण्याचं आव्हान आहे. नवनवीन अॅक्टिव्हीटीज करून काही करता येईल का याची सध्या चाचपणी सुरू आहे. त्यासाठी तरुण मुलांची टिम तयार केली जात आहे. आज इथे कोणीही नाटकाचा प्रयोग लावत नाही. कारण त्यांना उत्पन्न मिळत नाही. गिरगावात मराठी माणसेच हरवली असल्याने दोष कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे. यासाठी नव्याने मांडणी करण्याचे काम सध्या सुरू आहे.


इतिहास :
साहित्य संघ मंदिर हे सुरुवातीला ओपन एअर थिएटर होते. ८५ वर्षांपूर्वी इमारत बांधण्यात आली. त्याच्या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून त्या काळातील बरीच दिग्गज मंडळी उपस्थित होती. १९४४ मध्ये इथे मराठी नाटकांचा खूप मोठा महोत्सव झाला होता. या नाट्यगृहामध्ये ८०० आसनक्षमता आहे. पाचव्या मजल्यावर सभागृहासारखे थिएटर आहे. तिथे प्रयोगशील अशा काही गोष्टी होऊ शकतात. कोरोनामुळे बंद झालेले वाचन कट्टा आणि एकपात्री प्रयोग लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

साहित्य संघाने मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे - अभिनेता स्वप्नील जोशी
लहान असताना साहित्य संघमध्ये बरीच नाटकं पहिली आहेत. कालांतराने मांगलवाडीमधली साहित्य संघची गल्ली छोटी पडू लागली. गाड्यांची संख्या खूप वाढली आणि गिरगावातील मराठी माणसांची संख्याही कमी झाली. त्यामुळे मराठी नाटकांची संख्याही घटली. इथे कधी नाटक करण्याचा योगच जुळून न आल्याने कलाकार म्हणून काही सांगता येणार नाही, पण रसिक म्हणून साहित्य संघाने मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावल्याचे सांगेन. आज गिरगावमध्ये रिकन्स्ट्रक्शनचं वारे वहात असल्याने भविष्यात जेव्हा कधी साहित्य संघाच्या आसपास डेव्हलमेंट होईल, तेव्हा तिथपर्यंत पोहोचण्याचे रस्ते मोठे होतील याची काळजी घ्यायला हवी.

या नाट्यगृहाच्या असंख्य आठवणी मनात आहेत - अभिनेता-दिग्दर्शक प्रमोद पवार
इथली माणसे खूप सहकार्य करणारी आहेत. मराठी नाटकावर प्रेम करणारी आहेत. यामुळे मागील ४० वर्षांपासून या संस्थेसाठी नाट्यशाखेचा कार्यवाह म्हणून काम करत आहे. कलाकार म्हणून सुरुवात झाली ती आजपर्यंत सुरूच आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात या संस्थेनं 'टिळक आणि आगरकर' हे नाटक केले होते, जे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. स्पर्धेची नाटके इथे होत आहेत. या नाट्यगृहाच्या असंख्य आठवणी मनात आहेत. पुन्हा एकदा या नाट्यगृहाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी माझ्यासह तरुण मुलांची टिम झटत आहे.

Web Title: Special Article Me Natyagruha Boltoy Part 4 Marathi Sahitya Sangh Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक