"काही गोष्टी पैशासाठी करायला लागतात, तर...", सुबोध भावे कलाकार म्हणून स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:30 IST2025-10-07T14:29:44+5:302025-10-07T14:30:12+5:30
Subodh Bhave : सुबोध भावेने एका मुलाखतीत कलाकार म्हणून काम आणि मिळणारं मानधन याबद्दल आपलं मत मांडलं.

"काही गोष्टी पैशासाठी करायला लागतात, तर...", सुबोध भावे कलाकार म्हणून स्पष्टच बोलला
सुबोध भावे (Subodh Bhave) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत मालिका आणि चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतील तुटेना या मालिकेत समर राजवाडेची भूमिका साकारतो आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, आता सुबोधने एका मुलाखतीत कलाकार म्हणून काम आणि मिळणारं मानधन याबद्दल आपलं रोखठोक मत मांडलं आहे.
सुबोध भावेने व्हायफळ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कलाकार म्हणून आपलं मत मांडलं. तो म्हणाला की, ''मला असं वाटतं की विचारांची स्पष्टता ज्या क्षणी आयुष्यात येते ना त्या क्षणी आयुष्य फार सुंदर व्हायला लागतं. तिथे गोंधळ असेल ना तर मग कशातच आनंद मिळत नाही. मी कायम म्हणतो की तुम्ही कलाकार म्हणून आलात ना मग एका गोष्टीचा आनंद तुम्हाला मिळालाच पाहिजे. म्हणजे काही काही गोष्टी तुम्हाला पैशासाठी करायला लागतात. तर करायला लागतात. याच्यात तुम्हाला कमीपणा वाटण्यासारखं काही नाहीये आणि काही काही गोष्टी कलाकाराच्या समाधानासाठी करायला लागतात. मग त्याच्यात कदाचित पैशाचं समाधान नाही मिळणार. पण यापैकी कुठलं तरी एक समाधान तुला मिळालं पाहिजे. ''
''मग ते पैसे बघू नकोस...''
''ह्या दोन्ही नाही मिळाल्या मग ते काम नको करुस. मग हा रोल यथातथा असू देत, पिक्चर यथातथा असू देत, पण पैसे उत्तम आहेत. त्यांनी तुझं घर सहा महिने चालणार आहे? कर. मग तू ना सेटवरती गेल्यानंतर तू स्वच्छ असतोस किंवा पैसे नाही आहेत, पण रोल...मजा येणार आहे. मग ते पैसे बघू नकोस. कारण ते तुला पुढचं अनंत काम करण्याची ऊर्जा देणार आहे आणि ती महत्त्वाची आहे. त्यामुळे ही स्पष्टता पाहिजे,'' असे तो यावेळी म्हणाला.