संजय नार्वेकर करतोय 'चमत्कार', अभिनेता लवकरच येणार वेगळ्या भूमिकेतून भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:45 PM2022-04-13T17:45:05+5:302022-04-13T17:45:26+5:30

Sanjay Narvekar: अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा अष्टपैलू विनोदी अभिनेता संजय नार्वेकर आता रंगभूमीवर चमत्कार करायला येत आहे.

Sanjay Narvekar is performing 'Chamatkar', the actor will soon be seen in a different role | संजय नार्वेकर करतोय 'चमत्कार', अभिनेता लवकरच येणार वेगळ्या भूमिकेतून भेटीला

संजय नार्वेकर करतोय 'चमत्कार', अभिनेता लवकरच येणार वेगळ्या भूमिकेतून भेटीला

googlenewsNext

मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख असलेला, अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा अष्टपैलू विनोदी अभिनेता संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) आता रंगभूमीवर चमत्कार करायला येत आहे. तसे पाहिले तर मनोरंजन क्षेत्रात चमत्कार नेहमी घडतच असतात. पण इथे जादुई चमत्कार घडणार असून तो प्रत्यक्षात रसिकांना रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. कारण संजय नार्वेकर “चमत्कार” हया बालनाट्यात काम करतोय. साईराज निर्मित, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित “चमत्कार” हे बालनाट्य रंगभूमीवर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. 

बालनाट्य म्हटले की गमती जमती, चमत्कार, गिमिक्स हे आलेच. ‘चमत्कार’ हे नाटक अभ्यास हया विषयावर अवलंबून आहे. घरात पैसा म्हणजे सगळं काही, अशी समज असणारे आई बाबा आपल्या मुलांना अभ्यासापासून नेहमी परावृत्त करत असतात. हया त्रासाला कंटाळलेली मुलं आपल्या आई बाबांचा कसा विरोध करतात. त्यांना त्रास देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. त्यातूने ज्या काही गमती जमती, चमत्कार घडतात, ते हया नाटकात पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे लेखन, लोकप्रिय विनोदी अभिनेता संजय नार्वेकर यांचा अभिनय, ऋषिकेश घोसाळकर यांचे दिग्दर्शन आणि दर्जेदार बालनाट्यासाठी प्रसिध्द असलेली साईराज नाट्यसंस्था असा दुग्धशर्करा योग हया नाटकाद्वारे जुळून आला आहे. लेखक – दिग्दर्शक व निर्माते ऋषिकेश घोसाळकर यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय बालनाटये व व्यावसायिक नाटकं सादर केली आहेत. त्यांचे “हरी आला दारी” हे व्यावसायिक नाटक खुपच लोकप्रिय झाले होते. “चमत्कार” हे त्यांचे १२ वे व्यावसायिक नाटक आहे. “चमत्कार” या नाटकातून त्यांनी आजच्या मुलांचं भावविश्व साकारलं असून मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे.

अभिनेता संजय नार्वेकर यात प्रमुख भूमिकेत असून सोबत हिमांगी सुर्वे, प्रियांका कासले, चिंतन लांबे, संदेश अहिरे, प्रणाली बोराले, नेहा चव्हाण, अर्चित टक्के, सुधांशु कुलकर्णी, नीलिशा लाड, स्वरा वाडकर, मानस वसाने, उर्वी पटेल, मनवा वसाने, तीर्थ पटेल हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाचे सुत्रधार गोट्याकाका सावंत असून व्यवस्थापक शेखर दाते आहेत. चमत्काराबरोबरच फूल टू मनोरंजन करणारे हे बालनाट्य लहानमुलांसह मोठ्यांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.

Web Title: Sanjay Narvekar is performing 'Chamatkar', the actor will soon be seen in a different role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.