सई ताम्हणकरची आंतरराष्ट्रीय झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:30 IST2018-08-23T15:09:01+5:302018-08-24T06:30:00+5:30
मराठी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सई ताम्हणकरची आंतरराष्ट्रीय झेप
मराठी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘गजनी’मध्ये झळकल्यानंतर तिने हर्षवर्धन कुलकर्णी लिखित –दिग्दर्शित ‘हंटर’ या सिनेमात ती गुलशन देवियॉं आणि राधिका आपटेसोबत झळकली होती.
आता आगामी ‘लव्ह सोनिया’ या बॉलिवूड सिनेमाद्वारे सई पुन्हा एकदा आपल्या अभिनायाची चुणूक दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. तबरेझ नुरानी यांनी देहविक्रीचं धगधगतं वास्तव मांडणा-या या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. भारतासोबतच संपूर्ण देशाला भेडसावणा-या मानवी तस्करीच्या भीषण वास्तवावर हा सिनेमा भाष्य करतो. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. देहविक्रीच्या जगातल्या काळ्या वास्तवाच्या छटा ट्रेलरमध्ये पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात. सई अंजली ही व्यक्तिरेखा सिनेमात साकारतेय.
‘लव्ह सोनिया’ सिनेमाबद्दल बोलताना सई म्हणते, “या सिनेमाच्या प्रदर्शनाची मला प्रचंड उत्सुकता आहे. मानवी तस्करीसारखा हा ज्वलंत आणि संवेदनशील विषय या सिनेमामुळे प्रकाशझोतात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. लोकांनी या सिनेमाकडून एक चांगला धडा घेऊन आपल्या हक्कांची लढाई लढावी.” सईसोबतच या सिनेमात रिया सिसोदिया, मृणाल ठाकूर, राजकुमार राव मनोज वाजपेयी, फ्रिदा पिंटो, डेमी मूरे, रिचा चढ्ढा, मनोज वाजपेयी, अदिल हुसैन आणि अनिल कपूर आदी कलाकार महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांमध्ये झळकत आहेत. येत्या 14 सप्टेंबरला ‘लव्ह सोनिया’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी सिनेमाचा ट्रेलर पाहून सर्वांनाच सिनेमाची खुप उत्सुकता लागून राहिली आहे.