काय त्या अदा, काय ती नजर... रिंकू राजगुरूनं सादर केली लावणी, अमृता खानविलकर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:56 IST2026-01-02T09:51:44+5:302026-01-02T09:56:28+5:30
रिंकू राजगुरूच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

काय त्या अदा, काय ती नजर... रिंकू राजगुरूनं सादर केली लावणी, अमृता खानविलकर म्हणाली...
Rinku Rajguru Perform Lavani : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू 'आशा' चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे. १९ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रिंकूने या चित्रपटात एका 'आशा' सेविकेची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. रिंकू फक्त अभिनयातच नाही तर डान्सही कमाल करते. रिंकूनं काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक खास व्हिडीओ शेअर केला.
रिंकूने 'राजसा जवळी जरा बसा' या लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यावर लावणी सादर केली आहे. यावेळी तिच्यासोबत लावणी किंग आशिष पाटील दिसला. रिंकूने नऊवारी साडी, नाकात नथ, पायात घुंगरू अशा मराठमोळ्या लूकमध्ये लावणी सादर केली. आशिषनेही तिच्या लूकला मॅचिंग असा पोशाख परिधान केला. रिंकूच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्याववरुन नजर हटणेही कठीण झाले आहे.
रिंकू राजगुरूने हा डान्स व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "पिढ्यांचा वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटा प्रयत्न केला आहे आणि तुमच्याबरोबर हा व्हिडीओ शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. थँक्यू आशिष पाटील... तुझ्यामुळे माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. आम्ही यासाठी जास्त सराव केला नव्हता. ही लावणी मी माझी आवड म्हणून फक्त २ तास सराव करून सादर केली आहे".
रिंकू व आशिष यांचं नृत्य पाहून चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही प्रेमाचा वर्षाव केलाय. "ओह लव्ह लव्ह" अशी कमेंट मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरनं केली आहे. तर 'उफ्फ' अशी प्रतिक्रिया गायिका सावनी रविंद्रनं दिली आहे. "क्या बात हैं! क्या नजाकत है क्या अदा है! वाह वा! रिंकू तू इतकी चांगली डान्सर आहेस हे माहीत नव्हतं", "अति सुंदर... कोणाकडे पहावं... दोघं पण उत्तम", अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्यात.