रवी जाधवचा मुलगा मरणाच्या दारातून आला परत, जीवनदान देणाऱ्याशी झाली ऑनलाईन भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:05 AM2020-04-18T11:05:27+5:302020-04-18T11:06:03+5:30

रवी जाधवचा मुलगा अंशला १६व्या वाढदिवशी मिळालेल्या सरप्राइजबद्दल वाचल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीचे वाटेल कौतूक  

Ravi Jadhav's son returns from the door of death, Young cancer survivor e-meets life saver on 16th birthday  | रवी जाधवचा मुलगा मरणाच्या दारातून आला परत, जीवनदान देणाऱ्याशी झाली ऑनलाईन भेट

रवी जाधवचा मुलगा मरणाच्या दारातून आला परत, जीवनदान देणाऱ्याशी झाली ऑनलाईन भेट

googlenewsNext

भारतातील सर्वांत मोठी ब्लड स्टेम डोनर्स रजिस्ट्री असलेल्या दात्री या स्वयंसेवी संस्थेने कॅन्सरमधून बचावलेल्या अंश जाधव या तरुणाला त्याच्या सोळाव्या वाढदिवशी अनोखी भेट दिली. अंशला स्टेम सेल दिलेल्या मोनिष शांतीलाल सारा यांच्याशी अंशची ऑनलाइन भेट घडवण्यात आली. लॉकडाऊनमुळे असंख्य अडचणी असताना दात्री संस्थेने अंशला वाढदिवसाची भेट म्हणून मोनिषशी झूम कॉलच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी दिली.

३३ वर्षीय मोनीष यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी स्टेम सेल दान केली होती. तर १४ वर्षांच्या अंश जाधवला अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमेनिया (ऑल) हा आजार झाला होता. मोनीष यांनी दात्री संस्थेकडे २०१७ मध्ये नोंदणी केली होती. त्यांनी नोंदणी केल्यावर काही महिन्यांतच त्यांचे स्टेम सेल अंश जाधवला देण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच मोनीष आणि अंश यांची भेट झाली.या वेळी मोनीष म्हणाले, की देवानं मला कोणाला तरी वाचवण्यासाठी निवडलं असावं. एखाद्याला मरणापासून वाचवणं यापेक्षा अमूल्य दूसरं काहीच असू शकत नाही. सुरुवातीला मी घाबरलो होतो. स्टेम सेल देणं म्हणजे अवघड काहीतरी असेल अशी भीती वाटायची. पण दात्रीकडून मला सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजावण्यात आली. त्यामुळे मला विश्वास वाटला आणि पत्नीच्या पाठिंब्यानं मी पुढचं पाऊल टाकलं. आज अंशला पाहून खूप आनंद झाला. माझा थोडा वेळ देऊन मी एक जगणं वाचवलं. दात्रीच्या स्वयंसेवकांचा विशेषतः वर्षा आणि देव यांचे मला आभार मानावेसे वाटतात. मी दान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर माझी खूप काळजी घेतली गेली, अशी भावना मोनीष यांनी व्यक्त केली.


अंश जाधवला १३ व्या वर्षी अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाचं निदान झालं होतं. अंशच्या आजाराविषयी बोलताना त्याची आई मेघना अतिशय भावूक झाल्या. 'एक दाता मिळाला आणि आम्ही भाग्यवान ठरलो. अंशच्या आजाराविषयी कळल्यावर आम्ही अस्वस्थ झालो होतो. केमोथेरपी त्याच्यासाठी पुरेशी नव्हती आणि आमच्या कुटुंबातील कोणाच्या स्टेम सेल त्याला जुळत नव्हत्या. आमच्याकडे फार वेळही नव्हता. त्यामुळे आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करत होतो. त्याच्यावर उपचार करण्याच्या एक दिवस आधी डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी आमच्या आयुष्यातली सर्वांत आनंदाची बातमी दिली. अंशसाठी योग्य असा दाता दात्रीला मिळाला होता. ते क्षण आठवल्यावर आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या दात्याच्या रुपानं आम्हाला जणू देवच भेटला असं वाटतं. तो आनंद शब्दांत सांगता येणार नाही. अंशसारख्या कित्येक रुग्णांना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी दात्रीकडे नोंदणी करायला हवी,' असं मेघना यांनी सांगितलं.


अंशचे वडील रवी जाधव म्हणाले, की अंशला मिळालेला दाता कुठल्यातरी बाहेरच्या राज्यातला असेल असं आम्हाला वाटत होतं. पण मोनीष केवळ मुंबईचेच नाही, तर आमचे शेजरी असल्यासारखेच आहेत. आता लॉकडाऊन संपल्यावर आम्ही मोनीष आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे प्रत्यक्ष आभार मानणार आहोत.


रजिस्ट्री प्रोटोकॉलनुसार दाता आणि रुग्ण यांची एक वर्ष ओळख करून दिली जात नाही. मात्र एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दात्रीनं त्यांची ऑनलाईन भेट घडवून आणली.


बंगळुरूच्या मजुमदार शो कॅन्सर सेंटरच्या पेप्टियाट्रिक हेमेटॉलॉजी, ऑन्कोलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ. सुनील भट्ट या ऑनलाईन भेटीत सहभागी झाले होते. 'रुग्ण आणि दाता यांची ऑनलाईन भेट भारतात पहिल्यांदाच झाली आहे. अंशला नवीन जीवन देणारे मोनीष यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत. पण आजही कित्येक रुग्ण मोनीष यांच्यासारख्या प्रगल्भ दात्याच्या प्रतिक्षेत आहेत. जे त्यांचं आयुष्य वाचवू शकणार आहेत.


दात्रीकडे महाराष्ट्रातून केवळ ४१ हजार ४२७ जणांनीच आतापर्यंत ब्लड स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फारच छोटी आहे. ब्लड स्टेम सेल दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. या बाबत आणखी जागृती होणं गरजेचं आहे.
रघु राजगोपाल, डॉ. नेजिह सेरेब  आणि डॉ. सू यंग यांग यांनी  २००९ मध्ये दात्रीची स्थापना केली. ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी आरोग्यदायी, इच्छुक आणि आंशुवंशिक पद्धतीनं जुळणाऱ्या दात्याच्या शोधाचं काम ही संस्था करते. दात्रीकडे एकूण ४ लाख ४० हजार २०० वेक्षा जास्त दात्यांची नोंदणी आहे. त्यातील ७११ जणांनी ब्लड स्टेम सेल दान केले आहेत. दात्रीनं १० वर्षांत ५९ रुग्णालयांना मदत केली आहे. दात्री बोन मॅरो वर्ल्डवाईल्ड मध्ये ना नफा नोंदणीकृत आहे आणि वर्ल्ड मॅरो डोनर्स असोसिएशन या संस्थेची सदस्य आहे. अधिक माहितीसाठी www.datri.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Ravi Jadhav's son returns from the door of death, Young cancer survivor e-meets life saver on 16th birthday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.