"महेश मांजरेकर खरंच झपाटलेला आहे", राज ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:59 IST2025-10-13T11:51:36+5:302025-10-13T11:59:45+5:30
सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

"महेश मांजरेकर खरंच झपाटलेला आहे", राज ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' चा ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या धाडसाचं आणि 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' सिनेमाचं भरभरून कौतुक केलं.
राज ठाकरे म्हणाले, "'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय'चा ट्रेलर बघताना मला सुचलं की, महेश कोठारे यांना सांगितलं पाहिजे की, त्यांनी 'झपाटलेला २' हा सिनेमा महेश मांजरेकरांवर काढला पाहिजे. कारण, महेश खरंच झपाटलेला आहे. तो कधीही भेटला की, एखाद्या सिनेमाबद्दलच बोलतो. बरं त्यातही एक वेगळाच विचार घेऊन येतो. जे पाहतो ते भव्य पाहतो. आमच्यात एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे आम्ही जे पाहतो, ते भव्य पाहतो".
पुढे राज ठाकरे म्हणाले, "'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा पहिला सिनेमा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरांसाठी होता. पण 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा आहे. त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे सिनेमे घडत नाहीत. शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येबद्दलचा विषय अशा प्रकारे मांडणं हे एक वेगळंच धाडस आहे आणि वेगळा विचार आहे. असे विचार महेश नेहमीच करत असतो".
राज ठाकरे म्हणाले, "मी मागे एकदा म्हटलं होतं की, हिंदी चित्रपटसृष्टीत यश चोप्रा आहेत. तसं मराठीत महेश मांजरेकर आहेत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' सिनेमा महाराष्ट्र डोक्यावर घेईल, अशी मला खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असे अनेक सिनेमे आले, ज्यांना प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. ते सिनेमे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक सिनेमे होते. पण, महेशचा हा चित्रपट वर्तमान आणि भूतकाळावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता या सिनेमाला उचलून धरतील यात शंकाच नाही. सिनेमातले कलाकार आणि सगळ्याच टीमला माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा".
कधी प्रदर्शित होणार?
दरम्यान,'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं आहे. सिनेमात अभिनेते सयाजी शिंदे, सिद्धार्थ बोडके, मंगेश देसाई, शशांक शेंडे, पृथ्वीक प्रताप, पायल जाधव, त्रिशा ठोसर ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.