तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:05 IST2025-07-01T10:05:14+5:302025-07-01T10:05:53+5:30
'ये रे ये रे पैसा ३' च्या ट्रेलर लाँचला राज ठाकरेंनी 'या' मराठी अभिनेत्याची केली चेष्टा

तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' सिनेमाचा ट्रेलर लाँच काल पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीही आला होता. सर्वांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लाँच झाला. यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांच्या स्टाईलमध्ये विनोदाची फटकेबाजीही केली.
राज ठाकरे यांचे सिनेसृष्टीतील लोकांशी जवळचे संबंध आहे. ते नेहमीच मराठी सिनेमा, मराठी कलाकारांसाठी उभे राहिले आहेत. काही कलाकार त्यांच्या पक्षातही कार्यरत आहेत. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी राज ठाकरेंनी अभिनेते संजय नार्वेकर यांची कशी थट्टा केली याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. तसंच त्यांनी कालच आपणही एक ट्रेलर दाखवला आहे अशी मजेशीर प्रतिक्रियाही दिली. ते म्हणाले, "संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' सिनेमाचा हा ट्रेलर लाँच आहे. माझा ट्रेलर मी काल लाँच केला होता. पिक्चर अभी बाकी है. एका सिनेमाचे तीन भाग येणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी मोठी बाब आहे. मैलाचा दगड आहे. अमेय खोपकर यांनी ही हिंमत दाखवली. " नंतर त्यांनी सिनेमातील स्टारकास्ट सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, उमेश कामत आणि संजय नार्वेकर यांना स्टेजवर बोलवलं. संजय नार्वेकर यांना बोलवताना ते हसत म्हणाले, 'अरे ये रे, तू काय माझ्याकडे डोळे वटारुन बघतो?' संजय जाधव यांनी पहिला भाग ब्लॉकबस्टर दिला होता. आता तिसरा भागही ब्लॉकबस्टर होईल अशी मी अपेक्षा बाळगतो."
हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे काही दिवसांपासून सरकारविरोधात आक्रमत भूमिकेत होते. शिवसेनेसोबत म्हणजेच आपला भाऊ उद्धव ठाकरेंसोबत इतक्या वर्षांनी एकत्र येऊन ते मोर्चाही काढणार होते. मात्र त्याआधीच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रात पुन्हा असे निर्णय कधीच खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त ताकीदच दिली. यावरुनच त्यांनी आपण कालच ट्रेलर दाखवला असं मिश्कीलरित्या भाष्य केलं. ट्रेलर लाँचला त्यांच्या भाषणानंतर सगळ्यांमध्येच हशा पिकला.