"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:16 IST2025-08-15T16:14:59+5:302025-08-15T16:16:49+5:30
प्रिया बेर्डे यांनी त्यांना आलेला चाहत्यांचा धक्कादायक अनुभव सांगत आता चाहत्यांना सेल्फीसाठी सरळ नकार देत असल्याचं सांगितलं.

"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत सेल्फी घेण्यासाठी बाजूला उभ्या राहिलेल्या चाहत्याला जया बच्चन ढकलताना दिसल्या. जया बच्चन यांनी चाहत्यासोबत केलेल्या वर्तणुकीमुळे त्यांना ट्रोलही केलं गेलं होतं. जया बच्चन यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने पोस्ट शेअर करत तिचे चाहत्यांसोबतचे अनुभव सांगितले होते. मुग्धा गोडबोलेच्या पोस्टखाली अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी कमेंट करत त्यांना आलेला चाहत्यांचा धक्कादायक अनुभव सांगत आता चाहत्यांना सेल्फीसाठी सरळ नकार देत असल्याचं सांगितलं.
प्रिया बेर्डे म्हणाल्या, "खरं आहे असे अनेक अनुभव येतात. पण समजून कोण घेणार गं? मी अशाच एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथे बायकांनी माझे गाल ओढले. माझ्या दंडाला चिमटे काढले. माझ्याशी हात मिळवून माझ्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला. खूप भीषण अनुभव. काही बायकांना खांद्यावर हात टाकून फोटो काढायचा असतो. कमरेत हात घालून फोटो काढायचा असतो. हे सगळं जाम डोक्यात जातं. पण, मी आता ठामपणे नाही म्हणून सांगते. फोटो काढा पण एक अंतर ठेवून. राग आला तर येऊ दे".
प्रिया बेर्डेंनी सांगितलेला हा अनुभव धक्कादायक आहे. अनेकांनी प्रिया बेर्डेंच्या या अनुभवावर कमेंट करत त्यांची बाजू घेतली आहे. जया बच्चन यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आलेले अनुभव शेअर केले आहेत.