‘व्यक्तिरेखा ऊर्जा देणारी असावी’ - सौरभ गोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 12:23 PM2017-06-29T12:23:20+5:302017-06-30T16:20:07+5:30

अबोली कुलकर्णी अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि कथानकाची ओळख करून घेऊन त्यात जीव ओतून काम करणारा अभिनेता म्हणजे सौरभ ...

'Person should be giving energy' - Saurabh Gokhale | ‘व्यक्तिरेखा ऊर्जा देणारी असावी’ - सौरभ गोखले

‘व्यक्तिरेखा ऊर्जा देणारी असावी’ - सौरभ गोखले

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि कथानकाची ओळख करून घेऊन त्यात जीव ओतून काम करणारा अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला गुणी कलाकार आता एका नव्या रोलसह  प्रेक्षकांच्या भेटीला आला  आहे. ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ या कुकरी शो मध्ये तो सूत्रसंचालक म्हणून दिसत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी रंगलेला हा गप्पाटप्पांचा तास...

प्रश्न : ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ या कुकरी शो मधून तू अँकर म्हणून काम पाहत आहेस. काय सांगशील याविषयी?
- अँकर म्हणून पहिलाच शो पण तो खाणे आणि खिलवणे याबद्दल असल्यामुळे त्यात जास्त इंटरेस्ट आहे. या शोचे आत्तापर्यंत जवळपास 3500 भाग झाले आहेत आणि मोठमोठ्या अभिनेत्यांनी याचं अँकरिंग केलंय त्यामुळे कलर्स वहिनीच्या आणि देवस्व प्रोडक्षनच्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं अँकरिंग ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे. मी स्टेजवर अँकरिंग केले आहे. परंतु हा अनुभव नवीन आणि रिफ्रेशिंग आहे. हजरजबाबीपणा आणि उस्फूर्तता महत्वाची असल्यामुळे हा शो करायला खरंच मजा येते. नवीन लोकांबरोबर त्यांचे अनुभव ऐकणं आणि पाककला शिकणं हा मस्त अनुभव आहे.

प्रश्न : तुझा पहिलाच कुकरी शो आहे. यासाठी काय काय तयारी करावी लागली?
- कुकरी शो पहिलाच असला तरी खाण्याची आवड आणि कुकिंग शिकण्याची आवड असल्यामुळे तयारी अशी नाही करावी लागली.. पण शूटिंगच्या दिवशी डाएट बाजूला ठेवायची मानसिक तयारी मात्र नक्कीच करायला लागली.
 
प्रश्न: तुला वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड आहे का? अनुजाला किचनमध्ये तू एखादा पदार्थ बनवला तर आवडते का? एखादा किस्सा शेअर करशील?
- मला आणि अनुजा ला दोघांनाही खाण्याची प्रचंड आवड आहे. मी आणि ती दोघेही वेळ मिळेल तसा किचन मध्ये प्रयोग करत असतो. मला वाटतं कुकिंग हे उत्तम स्ट्रेस घालवण्याचं साधन आहे. किचनमध्ये काही बनवल्यानंतर ते चांगलं झालं तर त्याचा पुरेपूर आनंद मिळतो आणि डिश फसली तर तो विनोद जन्मभर हसायची संधी देतो. अनुजाला माझ्या हातचे पदार्थ खूप आवडतात. कधी कधी ती किचनमध्ये शिरून एखादा पदार्थ बनवायचा बेत करते मग तो जमत नसल्याचा उत्तम अभिनय करून तोच पदार्थ माझ्याकडून बनवून घेते.
 
प्रश्न:  तू इंडस्ट्रीत अभिनेता, अँकर अशा वेगवेगळ्या पातळयांमध्ये काम केलं आहेस. तुला कोणत्या प्रकारांत स्वत:ला पाहायला जास्त आवडतं?
- या प्रत्येक गोष्टीचा आनंद वेगवेगळा आहे कारण तिथे असणाऱ्या  कार्यपद्धतीचं स्वरूप वेगळं आहे. या दोन्ही प्रकारात मी लोकांना आवडतो हे ऐकायला मला आवडतं त्यामुळे दोन्ही ठिकाणी काम करायलाही तितकंच आवडतं.
 
प्रश्न:  थिएटरमुळे तुझ्या अभिनयातील करिअरला काय फायदा झाला?
- थिएटरचा प्रचंड फायदा झाला कारण लाईव्ह आॅडिअन्ससमोर अभिनय करताना जो प्रचंड आत्मविश्वास मिळवता येतो तो अभिनयात अतिशय महत्वाचा असतो. तिथे रिटेक नसल्याने क्षणोक्षणी काम हे एका अपेक्षित दर्जाचंच असणं गरजेचं असतं आणि तीच मेहनत इतर ठिकाणी चोख काम करायला मदत करते. त्यामुळे अभिनेता हा थिएटर मुळे खुलतो आणि पुढे प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करू शकतो.
 
प्रश्न: ‘राधा ही बावरी’ मालिकेने तुला काय मिळवून दिले?
 - सर्वात प्रथम काय दिलं असेल तर मला या मालिकेनी ओळख मिळवून दिली. घराघरांत सौरभ कोण हे लोकांना त्या मालिकेने कळलं आणि पुढे चांगलं काम करायची ऊर्जा दिली.
 
प्रश्न : आत्तापर्यंतच्या करिअरविषयक प्रवासातील तुझे प्रेरणास्थान कोण?
- अनेक मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी आजपर्यंत मला लाभली. यातील प्रत्येक व्यक्तीकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वीरेंद्र प्रधान, राकेश सारंग, शरद पोंक्षे, नीना कुलकर्णी, कविता मेढेकर, मंगेश कदम, प्रशांत दामले, सुबोध भावे यांना मी प्रेरणास्रोत म्हणेन. यांच्या नुसते बाजूला राहून काम केलं तरीही मनसोक्त शिकायला मिळतं.
 
प्रश्न : गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमा किती बदललाय, काय वाटते तुला?
- गेल्या काही वर्षात मराठी सिनेमात अफलातून प्रगती झालीये. भारतातल्या आणि बाहेरच्याही फिल्म इंडस्ट्री ची नजर मराठी सिनेमा काय करतो याकडे असणं ही अभिमानाची गोष्ट आहे. ही घोडदौड अशीच चालू राहिली पाहिजे.
 
प्रश्न : स्क्रिप्ट निवडताना तू कोणत्या बाबींवर लक्षकेंद्रित करतोस?

- मला नेभळट व्यक्तिरेखा करायला आवडत नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्तिरेखेतून लोकांना प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळू शकेल अशा व्यक्तिरेखा साकारण्याकडे माझा कल असतो.

Web Title: 'Person should be giving energy' - Saurabh Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.