म्हणून अक्षय कुमारने घेतली माघार, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 15:16 IST2019-08-03T15:12:22+5:302019-08-03T15:16:21+5:30

अभिनेता अक्षयकुमार यांनी त्यांचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा मिशन मंगल हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती.

Mission Mangal not being released in Marathi | म्हणून अक्षय कुमारने घेतली माघार, वाचा काय आहे प्रकरण

म्हणून अक्षय कुमारने घेतली माघार, वाचा काय आहे प्रकरण

अभिनेता अक्षयकुमार यांनी त्यांचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा मिशन मंगल हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी फेसबुक लाईव्हमधून त्याला विरोध करताच दोन तासात अक्षय कुमार यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले. 

मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आतापर्यंत आंदोलन करत आलो. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. १५ आॅगस्टला अक्षय कुमार यांचा 'मिशन मंगल' हा सिनेमा जगामध्ये हिंदीत प्रदर्शित होत आहे, तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील 'मिशन मंगल'ला आमचा विरोध नाही, पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला.

इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मनचिकसे मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील. चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.'मिशन मंगल' हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा. त्याला आमचा विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर 'मिशन मंगल' मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही, असे खोपकर यांनी फेसबुक लाइव्हद्वारे स्पष्ट केले. 

खोपकर यांनी मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमार यांनी आपला निर्णय बदलला. मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

Web Title: Mission Mangal not being released in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.