मुग्धा वैशंपायनच्या घरी लग्नाचा डबलबार; तिच्या पाठोपाठ ठरलं बहिणीचंही लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:49 AM2023-10-17T11:49:18+5:302023-10-17T11:49:51+5:30
Mugdha vaishampayan: मुग्धाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत बहिणीचं लग्न ठरल्याचे संकेत दिले आहेत.
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. आपल्या गोड आवाजाने कानसेनांना तृप्त करणाऱ्या मुग्धाने काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेमाची कबुली दिली. मुग्धा आणि गायक प्रथमेश लघाटे एकमेकांना डेट करत असून लवकरच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यामुळे सध्या या जोडीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आता मुग्धासोबत तिच्या बहिणीचंही लग्न ठरलं आहे. मुग्धाने एक पोस्ट शेअर करत याविषयीचे संकेत दिले आहेत.
मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी लवकरच लग्न करणार आहेत. त्यामुळे सध्या या जोडीचं केळवण केलं जात आहे. यामध्येच आता मुग्धाच्या बहिणीचंही लग्न ठरलं असून तिच्याही केळवणाचा कार्यक्रम नुकताच झाला. मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली.
'प्रिय, लाडके, डिअरेस्ट देवानंद काका, तुम्ही आम्हाला सोडून जाऊन ३ वर्ष झाली. असा एकही दिवस जात नाही की तुमची आठवण येत नाही… आज माझं आणि ताईचं केळवण होतं आपल्या खानावला.. तुम्हाला अशक्य मिस केलं…' , असं कॅप्शन देत मुग्धाने तिच्या बहिणीसोबतचे केळवणाचे दोन फोटो शेअर केले. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत ताईचं म्हणजेच मृदुलाचंही केळवण असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता वैशंपायन कुटुंबात एकाच वेळी दोन लग्नसोहळे रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश यांच्या केळवणाला सुरुवात तरी झाली आहे. मात्र, त्याच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे ही जोडी नेमकी कधी लग्न करणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.