पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:27 IST2025-10-30T11:26:03+5:302025-10-30T11:27:16+5:30
'गोंधळ'चा खिळवून ठेवणारा ट्रेलर पाहिलात का?

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
आपल्या मराठी संस्कृतीचा आणि श्रद्धांचा अविभाज्य भाग असलेला ‘गोंधळ’. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजरा होणारा एक पारंपरिक विधी आणि हाच पारंपरिक गोंधळ आता रुपेरी पडद्यावर येतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच थाटात पार पडला. या सोहळ्यात खऱ्या अर्थाने गोंधळ घालण्यात आला. पारंपरिक वाद्यांचे नाद, नृत्य, आणि मंत्रोच्चारांनी वातावरण भारून गेले होते. या पारंपरिक सादरीकरणाने लाँच सोहळ्याला एक आगळं-वेगळं सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झालं.
'गोंधळ'च्या ट्रेलरमध्ये कथानकात काहीतरी गूढ असल्याचे कळतेय. प्रत्येक व्यक्तिरेखा काहीतरी सांगत आहे. त्यामुळेच चित्रपटाची उत्कंठा अधिक वाढतेय. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी, तांत्रिक उत्कृष्टता आणि संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारं कथानक हे सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार पद्मविभूषण इलयराजा यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे.
ट्रेलरमधून पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक मांडणीचा अप्रतिम संगम दिसतो. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी अनपेक्षित आणि रहस्यमय वळण घेऊन येत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले,'गोंधळ' म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, परंपरा आणि विधींना आम्ही एका नव्या दृश्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटामागे एक समर्पित आणि कल्पक टीम कार्यरत आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सूर हा आपल्या संस्कृतीचा स्पंदन अनुभवायला लावेल. ‘गोंधळ’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर एक भावनिक आणि भव्य अनुभव देईल, जो मनात बराच काळ रुंजी घालेल, याची मला खात्री आहे.”
चित्रपट आपल्या मातीतील असून टिझर, ट्रेलर पाहून हा चित्रपट नेमका काय आहे, याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे 'गोंधळ'ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘गोंधळ’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना एक भव्य, रहस्यमय आणि सांस्कृतिक प्रवास घडवेल, यात शंका नाही.