"लोकांनी फसवलं अन् त्यामुळे ५ कोटींचं कर्ज झालं", पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला- "माझी ४ ते ५ वर्षे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:07 IST2025-05-05T16:54:12+5:302025-05-05T17:07:32+5:30
अभिनेता पुष्कर जोगने सांगितला कठीण काळ, म्हणाला...

"लोकांनी फसवलं अन् त्यामुळे ५ कोटींचं कर्ज झालं", पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला- "माझी ४ ते ५ वर्षे..."
Pushkar Jog: अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) हा 'जबरदस्त', 'वेल डन बेबी', 'मुसाफिरा', 'एआय धर्मा स्टोरी' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिनेसृष्टीत स्वत: चं एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पुष्कर जोग हा त्याच्या चित्रपटांसह बेधडक वक्तव्यामुळे देखील चर्चेत येत असतो. परंतु आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने केलेल्या एका वक्तव्याची सगळीकडे चर्चा आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच पुष्कर जोगने 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आयुष्यातील वाईट अनुभवांविषयी सांगितलं आहे. त्याबद्दल सांगताना पुष्कर म्हणाला, "मी २००७ साली जबरदस्त या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत डेब्यू केला. २००७ ते २०१२ हा काळ माझ्यासाठी चांगला होता. त्यानंतर २०१० साली माझे वडील गेले. पण, २०१२-१७ हा माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. कारण, तेव्हा काही लोकांनी मला व्यवसायात फसवलं. चित्रपटाची निर्मिती करायला सांगितली आणि तेव्हा चेक बाऊन्स केले."
त्यानंतर पुढे पुष्कर म्हणाला, "त्यामुळे माझ्यावर साधारण ५ कोटींचं कर्ज झालं. मग ते कर्ज फेडत असताना त्यामध्ये माझी चार ते पाच वर्षे वाया गेली. तेव्हा लोकांना वाटलं की हा तर संपला, इंडस्ट्रीतून बाहेर गेला. पण, जेव्हा तुम्ही काम करत नसता तेव्हा तुम्हाला कोणी फोन करत नाही शिवाय तुमचा फोनही कोणी उचलत नाही." असं म्हणत अभिनेत्याने आपल्या मनातील भावना व्यक्त करत कठीण काळावर भाष्य केलं.