"ती फ्लॅट सोडून माझ्यासाठी चाळीत राहायला आली...", मकरंद अनासपुरे भावुक, सांगितला पत्नीच्या त्यागाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:11 IST2025-11-15T17:53:47+5:302025-11-15T18:11:53+5:30
नाटकाच्या सेटवर पहिली भेट ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार 'अशी' आहे मकरंद अनासपुरेंची प्रेमकहाणी

"ती फ्लॅट सोडून माझ्यासाठी चाळीत राहायला आली...", मकरंद अनासपुरे भावुक, सांगितला पत्नीच्या त्यागाचा किस्सा
Makarand Anaspure: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत मकरंद अनासपूरे यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. मकरंद अनासपुरे यांनी 'गाढवाचं लग्न', 'साढेमाढे तीन', 'डावपेच','शासन', 'उलाढाल', 'नऊ महिने नऊ दिवस' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हास्याचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा मकरंद अनासपुरे आज जरी मराठी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर असले तरी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस खूप साधे, संघर्षमय आणि भावनिक होते. आणि त्या काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहणाऱ्यांपैकी एक म्हणजे ते त्यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे. दोघांची भेट रंगभूमीवर झाली.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अभिनय प्रवास,लग्न आणि प्रेमकहाणीवर भाष्य केलं.
अलिकडेच मकरंद अनासपुरे यांनी पत्नी शिल्पा यांच्यासह दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांची पहिली भेट कशी झाली , तसंच लग्नाविषयी सांगितलं.त्यांची ही कहाणी म्हणजे प्रेम, त्याग आणि खऱ्या नात्याचं सुंदर उदाहरण आहे. यावेळी त्यांच्या पत्नी शिल्पा म्हणाल्या,“मकरंदची आणि माझी मैत्री खूप चांगली होती. तेव्हा माझं ते पहिलंच नाटक होतं आमणि तेव्हाा तो मला खूप मार्गदर्शन करायचा. त्याक्षणी मला जाणवलं, हा माणूस काहीतरी वेगळा आहे. तो फक्त अभिनय करत नव्हता, तर जगत होता. त्यावेळी मला वाचणाची आवड नव्हती ती गोडी त्याने मला लावली. तशी आमची मैत्री खुलंत गेली. त्यानंतर आमचं मैत्रीतून प्रेमात रूपांतर झालं, पण त्यात कधी दिखावा नव्हता.”
शिल्पा पुढे म्हणाल्या, "मग घरी लग्नाचा विषय चाललाच होता. शिवाय आमच्यात मैत्री होती. मी विचार केला, आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर माणूस चांगला हवा. त्याचा स्वभाव चांगला असावा.मकरंद माझा चांगला मित्र होताच मग मी त्याची निवड केली.”
मकरंद त्या काळात चाळीत राहत होते, आणि आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यावर बोलताना ते भावुक होत म्हणाले, “संसार थाटायचा म्हणजे ती एक जबाबदारीची गोष्ट आहे ती साधी गोष्ट नव्हती. सगळ्यात पहिलं श्रेय मी माझ्या सासू-सासाऱ्यांना देईन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांतच्या मुलीचाहात माझ्या हातात दिला. आणि दुसरं तिचं की तिला असा माणूस आवडला, ज्याचा काहीच अतापताच नाही. ती कॉनव्हेन्टमध्ये शिकलेली आणि मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेलो. आमच्यात भाषेचाही खूप फरक होता.मी चाळीत राहायचो आणि ती तिचा मोठा फ्लॅट सोडून माझ्याबरोबर चाळीत राहायला आली. संसार थाटायचा म्हणजे जबाबदारी असते, ती सोपी गोष्ट नाही. पण माझ्या सासू-सासऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आणि शिल्पाने माझा हात धरला. आज माझ्या आयुष्यात जी काही स्थिरता आहे, ती तिच्यामुळेच.”