"थंडी वाजून ताप आला अन्...", आईच्या आठवणीने तेजस्विनीला अश्रू अनावर, म्हणाली- "मला आणि माझ्या बहिणीला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:07 IST2025-10-16T10:03:04+5:302025-10-16T10:07:08+5:30
आईच्या आठवणीने तेजस्विनी पंडित भावुक, म्हणाली- "अचानक तीन दिवसात..."

"थंडी वाजून ताप आला अन्...", आईच्या आठवणीने तेजस्विनीला अश्रू अनावर, म्हणाली- "मला आणि माझ्या बहिणीला..."
Tejaswini Pandit: मराठी सिनेविश्वातील जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने त्याचं निधन झालं. ज्योती चांदेकरांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांना धक्काच बसला. गेल्या अडीच वर्षांपासून त्या 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रत्येक मालिका रसिकाला भावली. अनेकदा मालिकेच्या सेटवर देखील त्यांची प्रकृती मात्र, त्यांनी प्रेक्षकांच्या प्रेमापायी काम करणं थांबवलं नाही. त्यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही त्यांची कन्या आहे. ज्योती चांदेकर यांना जाऊन २ महिने झाले आहेत. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेत्रीने आईबद्दलच्या भावुक आठवणी शेअर केल्या आहेत.
नुकतीच तेजस्विनी पंडितने लोकशाही मराठीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यान, आईविषयी बोलताना तेजस्विनी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, "एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जर का तुमचे आई-वडील तर त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी करा. मला आणि माझ्या बहिणीला खूप गोष्टी तिच्याबरोबर करायच्या होत्या. कारण,आमचे वडील गेले तेव्हा पण त्यांच्याबरोबर करायच्या गोष्टी राहून गेल्या. त्यामुळे आमचं असं झालं की आईबरोबर तरी त्या गोष्टी करूयात. १६ ऑगस्टला माझी आई गेली... त्यानंतर ३१ ऑगस्टला तिचा वाढदिवस असतो. त्या दिवशी आम्ही तिच्यावर एक पुस्तक प्रकाशित करणार होतो. पण, अचानक तीन दिवसांत गोष्टी बदलल्या. १२ तारखेला तिला रुग्णालयात दाखल केलं आणि १६ तारखेला असं झालं."
त्यानंतर पुढे तेजस्विनी पंडित म्हणाली, "आईला थंडी वाजून आली ताप आला हेच कारण होतं. त्यानंतर तीन दिवसांत ती आम्हाला सोडून गेली. मी सगळ्यांना हिच गोष्ट सांगेन, तुम्ही काही गोष्टी तुमच्या आईबरोबर किंवा परिवाराबरोबर करण्याच्या ठरवल्या असतील, तर त्या करा. खरंच, आयुष्याचा काही नेम नाही. "
तिच्या पोटी जन्माला येणं हे माझं अहोभाग्य...
"आईच्या कारकिर्दीला जवळजवळ ५० वर्षांहून अधिक काळ झाला. नाटकापासून तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर मग नाटक, सिनेमा आणि मालिका अशा माध्यमांत तिचं काम सुरु झालं. तिने ज्या माध्यमांमध्ये काम केलं आहे, त्या वर्षीचे सगळे पुरस्कार घरात असायचे. तिच्या पोटी जन्माला येणं हे माझं अहोभाग्य समजते. तिचं हे कार्य मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते. " अशा भावना तेजस्विनीने मुलाखतीत व्यक्त केल्या.