"मला ते झेपलंच नाही, कारण...", गिरीजा ओकच्या 'त्या' व्हायरल फोटोबद्दल 'अशी' होती आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:54 IST2026-01-06T17:51:41+5:302026-01-06T17:54:53+5:30
"मला अनेक फोन आले...", गिरीजा ओकच्या व्हायरल फोटोबद्दल आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

"मला ते झेपलंच नाही, कारण...", गिरीजा ओकच्या 'त्या' व्हायरल फोटोबद्दल 'अशी' होती आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Girija Oak Mother Rection on Her Viral Photo: अभिनेत्री गिरीजा ओक या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. मराठीसह बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत तिने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. अलिकडेच निळ्या साडीतील तिची एक मुलाखत काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली आणि तिचा लूक, साधेपणा चाहत्यांना खूपच भावला. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत असते. या मुलाखतीमध्ये तिने नेसलेल्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि गिरीजा रातोरात नॅशनल क्रश झाली. या सगळ्या प्रकारानंतर गिरिजाच्या आईला काय वाटत होतं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच गिरीजा ओक आणि तिच्या आई पद्मश्री पाठक यांनी सुलेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लेक गिरिजाच्या व्हायरल फोटोंबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. यावेळी गिरिजाच्या आई म्हणाल्या,"मला ते झेपलंच नाही. म्हणजे मला कळलंच नाही हे काय असतं. कोण करतं? त्यानंतर मला पण अनेक फोन आले. जेव्हा ती घरी आली तेव्हा मी तिला हा प्रश्न विचारला गिरिजा हे कसं झालं, कोणी केलं. मग ती म्हणाली, अगं हे मी नाही केलं, असे माझे भाबडे प्रश्न होते."
त्यानंतर गिरीजाच्या आई पुढे म्हणाल्या," मला नागपूरच्या भावजयीने मला फोन केला आणि म्हणाली, अगं तिने काय पीआर बदललाय की काय, नॅशनल क्रश झाली आहे. मग मी म्हटलं असं खरंच करून घेतात की काय किंवा असं काही असतं का कारण मला यातलं काही माहित नव्हतं. असे प्रश्न मला पडले. पण तिने उत्तर दिलं. असं काही नव्हतं. लोकांना तिचे ते दोन-तीन व्हिडीओज आवडले. त्यातून ती फेमस झाली. "
गिरिजा काय म्हणाली....
या मुलाखतीत गिरीजालाही विचारण्यात आलं तुला काय वाटतंय, त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली,"मला मजा येतेय. एक तर मला आईचाही फोन आला आणि त्यानंतर माझ्या आत्याची सुद्धा मला व्हाईस नोट आली. मुळात नॅशनल क्रश म्हणजे काय असतं हे मला माहितचं नाही असा तिचा मेसेज होता. अनेकांना असाही प्रश्न पडला की काही वाईट तर झालं नाही ना. असे खूप वेगवेगळे प्रश्न पडले होते."
यावेळी गिरिजा गमतीत म्हणाली," मळात याला काही अर्थ नसतो. त्याला तेव्हाच अर्थ मिळेल जेव्हा मला काही फायदा असेल.दरवेळी मला रिक्षा, टॅक्सी मिळेल अशी हमी मिळाली तर, त्याला अर्थ आहे. काहीतरी या गिफ्ट असावं, प्राईज मनी असावं. पण, अर्थात मला याच आनंद आहे. लोक मला नॅशनल क्रश वगैरे म्हणत आहेत."