"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:59 IST2025-07-05T18:58:41+5:302025-07-05T18:59:07+5:30
तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत.

"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या हिंदी भाषा अनिवार्यच्या निर्णयाला सगळीकडूनच कडाडून विरोध झाला. यानंतर राज्य सरकारने हिंदी भाषा अनिवार्यचा जीआर रद्द करत यावर पुर्नविचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत वरळीमध्ये विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. ठाकरे बंधूंना एकत्र पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांनी या मेळाव्यातील काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"बाकी काही असो..डोळे आणि मन आज तृप्त झाले.. तमाम महाराष्ट्र वर्षानुवर्षे ज्या दिवसाची वाट पाहत होता शेवटी तो दिवस आज उजाडला.. दोन भाऊ, दोन कुटुंब एकत्र येण्यासारखं दुसरं सुख नाही..!! जय मराठी..जय महाराष्ट्र...", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर सुरेश विश्वकर्मा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.