मंगेशच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक
By Admin | Updated: June 23, 2016 02:39 IST2016-06-23T02:39:16+5:302016-06-23T02:39:16+5:30
कोणत्याही चित्रपटासाठी टोकाची मेहनत करणं काही कलाकारांच्या स्वभावात असते... आणि त्यात एखादा दिग्गज पडद्यावर साकारायचा असेल, तर ती मेहनत दुप्पट होते.

मंगेशच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक
कोणत्याही चित्रपटासाठी टोकाची मेहनत करणं काही कलाकारांच्या स्वभावात असते... आणि त्यात एखादा दिग्गज पडद्यावर साकारायचा असेल, तर ती मेहनत दुप्पट होते. एखादी भूमिका साकारणे आणि सिनेसृष्टीत गाजलेली छबी आपल्या अभिनयातून दाखवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात एखादी व्यक्तिरेखा साकारणे सोपे असते; मात्र ज्या अवलियावर प्रेक्षक गेली कित्येक वर्षे प्रेम करतात अशा नटाच्या चरित्रपटात त्याची भूमिका तंतोतंत वठवणे एक मोठं आव्हान... हेच आव्हान मंगेश देसाई या अभ्यासू अभिनेत्याने लीलया पेलले आहे. याविषयी अभिनेता मंगेश देसाई म्हणतो, ‘‘एक अलबेला’ चित्रपटाची आॅफर आल्यापासून मी बाकी सगळी कामे बाजूला ठेवून केवळ भगवान दादांचा अभ्यास करीत होतो. या तयारीदरम्यान तब्बल २२-२५ वेळा अलबेला हा चित्रपट पाहिला. दरम्यान, शूटिंग सुरू होण्यापूर्वी सुरू झालेला हा अभ्यास शूटिंग संपेपर्यंत सुरू होता. आजचे शूटिंग संपवून उद्या कोणता सीन आहे, याची विचारणा करायची आणि कितीही उशीर झाला, तरी घरी जाऊन त्या सीनची रिहर्सल करण्याचा माझा रोजचा दिनक्रम होता.’’ म्हणतात ना, केलेली मेहनत वाया जात नाही... हेच खरं... चित्रपटाचा टीझर लाँच झाला आणि मंगेश देसाईच्या मेहनतीला फळ मिळालेले दिसत आहे. चारी बाजूंनी या अभ्यासू अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तसेच, दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांचेही कौतुक झाले... आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती मंगलमूर्ती फिल्म्स आणि किमया मोशन पिक्चर्स यांच्या ‘एक अलबेला’ या चित्रपटाची. हा चित्रपट २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.