मंगेश देसाईसोबत काय बिनसलं? महेश टिळेकर म्हणाले- "माझ्याकडून अॅडव्हान्स पैसे घेऊन त्याने..."
By देवेंद्र जाधव | Updated: July 15, 2025 12:59 IST2025-07-15T12:58:04+5:302025-07-15T12:59:00+5:30
महेश टिळेकर यांनी अभिनेता - निर्माता मंगेश देसाईसोबत काय वाद झाला, याचा खुलासा केला आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या

मंगेश देसाईसोबत काय बिनसलं? महेश टिळेकर म्हणाले- "माझ्याकडून अॅडव्हान्स पैसे घेऊन त्याने..."
महेश टिळेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्पिय अभिनेते आणि दिग्दर्शक. महेश यांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. मराठी तारका हा सुपरहिट कार्यक्रम महेश यांनी जगभरात पोहोचवला. महेश यांचं काही वर्षांपूर्वी 'धर्मवीर' फेम अभिनेते-निर्माते मंगेश देसाईसोबत बिनसलं होतं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश टिळेकर यांनी नेमकं काय घडलं, हे सांगितलं
मंगेश देसाईसोबत काय बिनसलं?
महेश टिळेकर म्हणाले, "आता पुलाखालून एवढं पाणी गेलंय. माझं म्हणणं आहे की, एकदा तुम्ही कमिटमेंट केली ना.. मी गेली ३० वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय. माझ्याबद्दल तू कोणत्याही आर्टिस्टला विचार. माझं कधीच कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालं नाहीये. माझ्या एका शब्दावर सगळे कलाकार आले आहेत. एकदा शब्द गेला म्हणजे गेला, पैसे ठरले म्हणजे ठरले. बऱ्याच जणांना माहित असतं कोण प्रामाणिक आहे आणि कोण फसवण्यासाठी आला आहे."
"कुठे पैसे बुडणारेत? हे अनेकांना माहित असतं. कलाकारा माझ्या शब्दाला किंमत देणार आहेत. मग एकदा का तुम्ही कमिटमेंट केली की, अमुक एका तारखेला येतोय म्हटल्यानंतर तुम्ही ऐनवेळेला कशी कमिटमेंट बदलू शकता."
"मंगेश आधी माझ्या फिल्मसाठी हो म्हणाला होता. त्याला नंतर दुसरी संजय सूरकरांची मास्तर एके मास्तर ही फिल्म मिळाली. तो मला म्हणाला, तुम्ही तारखा थोड्या अॅडजस्ट कराल का. मी त्याला म्हटलं, माझ्याकडे निळूभाऊ, संजय नार्वेकर वगैरे सगळे आर्टिस्ट आहेत. मी कसं अॅडजस्ट करणार? असं असेल तर, मला एक फिल्म सोडावी लागेल. तो त्याचा निर्णय होता. मग त्याने माझी फिल्म सोडली. मी म्हटलं, अॅडव्हान्स घेतलेले पैसे परत दे. यात मी काय चुकलो. तुम्ही मला माझे पैसे परत दिले पाहिजेत. त्याच्यानंतर मी पोस्ट लिहिली होती."