लक्ष्मीकांत बेर्डेंची पहिली पत्नीदेखील होती प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्याने दागिन्यांसह दिला होता त्यांना मुखाग्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:42 IST2025-05-20T16:41:58+5:302025-05-20T16:42:55+5:30
Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बर्डे यांच्या पत्नीचे नाव प्रिया बेर्डे आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रुही बेर्डे होते. त्या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या.

लक्ष्मीकांत बेर्डेंची पहिली पत्नीदेखील होती प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्याने दागिन्यांसह दिला होता त्यांना मुखाग्नी
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी एकेकाळी मराठी कलाविश्वात अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही लोक लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. त्यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे. लक्ष्मीकांत बेर्डेंचं सिनेमांसोबतच खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं. लक्ष्मीकांत बर्डे यांच्या पत्नीचे नाव प्रिया बेर्डे (Priya Berde) आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रुही बेर्डे (Ruhi Berde) होते. त्या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या.
रुही बेर्डे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. रुही बेर्डे यांचं खरं नाव पद्मा होते. त्यांचे पडद्यावरील नाव रुही असे होते. रुही या मूळच्या मुंबईच्या होत्या. त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीपासून झाली होती. आ गले लग जा हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी शत्रूघ्न सिन्हा यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांचे डार्लिंग डार्लिंग हे नाटक लोकप्रिय ठरले होते. १९७३ साली जावई विकत घेणे आहे या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांची दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार सिनेमातील भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. त्यानंतर रुही यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.
रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डेंची अशी झाली पहिली भेट
रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली भेट वेडी माणसं या नाटकाच्या प्रयोगदरम्यान झाली. त्यानंतर पुन्हा एकदा कश्यात काय लफड्यात पाय या नाटकाच्या निमित्ताने ते दोघे एकत्र आले. या दरम्यान दोघांचे सूत जुळले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या नाटकामुळे प्रसिद्धी मिळाली त्या शांतेच कार्ट चालू आहे या नाटकात देखील दोघांनी एकत्र काम केले होते. १९८३ साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केले. रुही ही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातली खरी लक्ष्मी ठरली होती. लग्नानंतर लक्ष्मीकांत यांच्या सिनेकरिअरमध्ये भरभराट झाली. पण त्यांच्या आयुष्यात वादळ आलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना रुही यांची जास्त काळ साथ लाभली नाही.
रुही बेर्डेंनी घेतला जगाचा निरोप
एक दिवस रुही बेर्डे यांना अंधेरी येथे गाडीतून प्रवास करत असताना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाला. त्यावेळी त्यांच्या ड्रायव्हरने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. मात्र, काही दिवसाच्या उपचारानंतर ५ एप्रिल १९९८ रोजी रुही यांचे निधन झाले. रुही यांच्या निधनामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनावर फार मोठा आघात झाला होता. ते पार हदरुन गेले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की, रूही खरंच लक्ष्याची लक्ष्मी होती तिच्या पायगुणाने लक्ष्या प्रसिद्धीच्या आणि ऐश्वर्याच्या शिखरावर पोहोचला. तिच्या जाण्याने लक्ष्या खचून गेला होता. तो इतका की नंतर त्याने कधीच उभारी धरली नाही. तो बरेच दिवस मित्रांशी बोलतच नव्हता. रुही गेल्यावर समशानभूमीत अग्नी देताना तिच्या अंगावरचा एकही अलंकार न काढू देणारा लक्षा, तिच्या पार्थिवासमोर निशब्द उभा होता.