"वडील हेच माझे गुरु" कार्तिकी गायकवाडनं सांगितलं आयुष्याला कशी दिली दिशा
By अबोली कुलकर्णी | Updated: July 16, 2025 13:04 IST2025-07-16T12:48:02+5:302025-07-16T13:04:03+5:30
कार्तिकी गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका आहे. कार्तिकीनं तिचे वडील हेच तिच्या आयुष्यातील गुरु असल्याचं सांगितलं.

"वडील हेच माझे गुरु" कार्तिकी गायकवाडनं सांगितलं आयुष्याला कशी दिली दिशा
संत कबीर त्यांच्या दोह्यात म्हणतात, 'गुरू बिन घोर अंधेरा' याचा अर्थ आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात जगाला ओळख करून देणारा तो एकमेव व्यक्ती म्हणजे गुरु. होय, आपल्या आयुष्यात अनेक गुरू असतात. माझ्या आयुष्यातील गुरू म्हणजे माझे वडील 'महाराष्ट्र शासन कंठ संगीत पुरस्कार' प्राप्त गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड. वडील गायक असल्याने संगीत आमच्या रक्तातच आहे. मी दोन वर्षांची असल्यापासून माझ्या भावांसोबत वडिलांकडेच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवते. गुरूकुल पद्धतीने घरी बाबा अनेक मुलांना शिकवायचे. तेव्हापासून गायनाचे संस्कार झालेत ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत असतील. त्यांचे विचार, शिस्त, प्रामाणिकपणा, नम्रभाव हे सर्वच गायकाच्या ठायी असावे, असे ते सांगतात.
२००८ मध्ये मी केवळ ९ वर्षांची होते तेव्हा 'सारेगमप' या संगीत रिॲलिटी शोमधून छोट्या पडद्यावर आले. ८ ते १४ वयोगटातील हजारो मुलांमधून मला अंतिम ५० मध्ये स्थान मिळवण्यासाठी निवडण्यात आले, हे एक मोठे यश होते. फेब्रुवारी २००९ मध्ये मला स्पर्धेची विजेती म्हणून घोषित करण्यात आले. माझ्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आळंदीत मोठी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. हा शो खऱ्या अर्थाने माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
अभंग, गवळणी, मराठी गाणी, हिंदी जुनी, नवीन सर्वच गाणी श्रवण करण्याचा माझ्या वडिलांचा आग्रह असायचा. श्रोत्यांना काय हवे आहे, याचा अभ्यास करायचा त्यांचा कटाक्ष असतो. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाताना श्रोत्यांना जी गाणी आवडतात, त्यासोबतच आपलीही वेगळी गाणी सादर करायची, असे ते नेहमी सांगतात. लाईव्ह गाताना घ्यावयाची काळजी, शिस्त, सातत्य यांची त्यांनी शिकवण दिली. ते प्रत्येक इव्हेंटनंतर कौतुकाची थाप देतात, तसेच कुठे चुकलं हे देखील तेवढंच प्रेमाने पाठीवरून हात फिरवत सांगतात.
मला आठवतं की, २००८ मध्ये जेव्हा आम्ही ‘सारेगमप’ या शोसाठी रियाज करायचो. तेव्हा बाबा माझ्यासोबत कायम असायचे. कधी कधी असं व्हायचं की, माझा आवाज लागत नसायचा. मग ते मला म्हणायचे, काय झाले? आज तुझे लक्ष नाहीये, कुठे हरवलीयेस? जा बाळा, थोडं खेळून ये मग आपण पुन्हा रियाज करू. त्यानंतर तसंच व्हायचं. मी खेळून आले की, फ्रेश व्हायचे आणि मग त्यांना हवा तसा माझा आवाज लागायचा. त्यावरून मी हे शिकले की, तुम्ही गुरूंनी दिलेली शिदोरी ही कायम स्वत:जवळ ठेवली पाहिजे.