मुलीला इंग्रजी शाळेत घातल्याचा जितेंद्र जोशींच्या पत्नीला पश्चात्ताप, म्हणाली "मराठी माध्यमाचं महत्त्व..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:17 IST2025-12-31T16:16:31+5:302025-12-31T16:17:35+5:30
जितेंद्र जोशीच्या इच्छेविरुद्ध मुलीला इंग्रजी माध्यमात शिकवल्याची खंत मिताली जोशीनं बोलून दाखवली आहे.

मुलीला इंग्रजी शाळेत घातल्याचा जितेंद्र जोशींच्या पत्नीला पश्चात्ताप, म्हणाली "मराठी माध्यमाचं महत्त्व..."
आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणारा आणि मराठी साहित्यावर जिवापाड प्रेम करणारा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी ओळखला जातो. जितेंद्र जोशीची पत्नी मिताली जोशी चित्रपट व नाटकांचे लेखन करते आणि तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. अशातच मितालीने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने जितेंद्र जोशीच्या इच्छेविरुद्ध मुलीला इंग्रजी माध्यमात शिकवल्याची खंत बोलून दाखवली आहे.
मितालीनं सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणाली, "या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये. माझं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहेत. लहानपणी "मला का नाही घालतं मराठी माध्यमाच्या शाळेत" म्हणून रडायचे मी, पण मुलीला शाळेत घालायची वेळ आल्यावर मात्र इंग्रजी माध्यम निवडलं. हा निर्णय घेताना आपण कुठे रहातो, इथे आसपास इतर मराठी माध्यमाच्या शाळा आहेत का, मला तिचा अभ्यास घेता येईल का? कारण माझं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेलं आहे ही (आत्ता कमकुवत वाटणारी) शहानिशा केली आणि माझ्या पतीच्या इच्छेविरुद्ध तिला घरासमोरच्या इंटरनॅशनल स्कूल घातलं".
मितालीनं पुढे लिहिलं, "तिला तिची मातृभाषा व्यवस्थित बोलता येईल, याची मनोमन जबाबदारी घेतली. बाळ असल्यापासून तिच्या कानावर बालकवी, बोरकर, कुसुमाग्रज आणि अगदी मर्ढेकर पण पडतील, याची तसबीज केली. बाळाला अंघोळ घालताना मराठी कविता म्हणायच्या, हा माझा रतीब... ती माझ्या हातात असेपर्यंत ठेवला मी, पण, मग बाळ मोठ झालं".
मिताली पुढे म्हणाली, "मराठी कस आहे तुझं?" ह्यावर "अस्खलित" असं उत्तर देणारं माझं २ वर्षाचं बाळ, कर्ता कर्म क्रियापद इंग्रजीच्या व्याकरणाप्रमाणे वापरू लागलं. बोरकर, बालकवी लांब गेलेच पण Wordsworth, Frost, Dikenson पण जवळ नाही आले. कविता लांब गेली... फ्रेंचमध्ये महिने, वार पाठ झाले पण चैत्र वैशाख काही लक्षात राहिले नाहीत", अशी हळहळ तिनं व्यक्त केली.
तिनं पुढे लिहलं, आता ह्यातून माझी अपराधीपणाची भावना बाजूला काढली तर नुकसान काय झालं? मराठी माध्यमात शिकणाऱ्या सगळ्यांना कुठे असते कवितेशी सगली? जगात वावरताना अनेक न्यूनगंड असणारच आहेत. दिसण्याचे, असण्याचे… यात भाषा नकोमध्येच.. इत्यादी कारणं देतोच आपण. मी स्वतः दिलीयेत. पण, मग हेमंत ढोमे आणि क्षीती जोग हे क्रांतिज्योती विद्यालय सारखा सिनेमा बनवतात आणि माझ्या तोंडात चपराक बसते".
तिने शेवटी लिहिलं, "पालक म्हणून एक मूलभूत जबाबदारी आपण नाकारली ही मनात बंद करून ठेवलेली भावना बाहेर येते. मी चुकले! तुम्ही चुकू नका. मुलांना निदान महिन्यांची नावं, सणवार, गडकिल्ले, माती, खरीप आणी रब्बी पिक जी इथे उगवली जातात, इथला भूगोल आणि सगळ्यात महत्वाचं, इथला इतिहास शिकवा आणि साहित्य स्वतः वाचा. आणि हा सिनेमा बघा! धन्यवाद हेमंत! खूप खूप आभार.. मातृभाषेत शिक्षण घेता येणं ही एक पर्वणी आहे".