"माझं फ्रेंड सर्कल नाही...", रिंकू राजगुरूला लहान वयात यश मिळालं, पण हिरावलं बालपण, तिनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:18 IST2025-12-29T16:17:57+5:302025-12-29T16:18:49+5:30
Rinku Rajguru : रिंकू राजगुरू सध्या तिच्या 'आशा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या आयुष्यातील काही हळवे आणि महत्त्वाचे पैलू उघड केले आहेत.

"माझं फ्रेंड सर्कल नाही...", रिंकू राजगुरूला लहान वयात यश मिळालं, पण हिरावलं बालपण, तिनेच केला खुलासा
'सैराट' फेम रिंकू राजगुरू सध्या तिच्या 'आशा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने तिच्या आयुष्यातील काही हळवे आणि महत्त्वाचे पैलू उघड केले आहेत. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, अभिनयाची आवड जोपासताना आणि सिनेसृष्टीत काम करताना तिला तिचे 'शालेय जीवन' आणि 'बालपण' कसे गमवावे लागले.
अभिनयासाठी शाळा सुटली रिंकू म्हणते की, "माझी शाळा सुटल्यामुळे माझ्या अनेक गोष्टी तिथेच थांबल्या". रिंकूने आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "खरं सांगायचं तर, मला बालपण अनुभवताच आलं नाही, मी खरं सांगतेय. कारण माझं शाळा सुटल्यामुळे माझ्या तिथंच सगळ्या गोष्टी थांबल्या आणि मी सगळं 'एक्सटर्नल' शिक्षण केलं. त्याच्यामुळे मी तिथे कधी गेलेच नाही. पण जितक्या काही ओळखीच्या मैत्रिणी होत्या, त्यांना कधीतरी असं फोन केला तर कळतं की हिचं तर लग्न झालंय, हिला तर मुलगी झालीये... म्हणजे पुन्हा तेच, सगळे इतके गुंतलेले आहेत ना! आणि तिथे गेलं की कळतं की आपण काहीतरी वेगळं शिकलोय आणि वेगळ्या लोकांमध्ये वाढलोय, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आता इथे खूप वेगळ्या आहेत."
रिंकूने दिली प्रांजळ कबुली
दोन जगांमधील तफावत सिनेसृष्टीचे ग्लॅमर आणि गावाकडील साधेपणा यातील फरक तिला सतत जाणवतो. ती मोकळेपणाने मान्य करते की, जर ती गावातच राहिली असती, तर तीही त्यांच्यासारखीच वाढली असती. सध्या ती स्वतःच्या संकल्पनांवर काम करत असून अभिनयातील हा प्रवास जरी यशस्वी असला, तरी शाळेच्या आठवणी आजही तिच्या मनात घर करून आहेत. रिंकूची ही प्रांजळ कबुली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'आशा' सिनेमाबद्दल
रिंकू राजगुरूचा 'आशा' हा सिनेमा १९ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमात महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका रिंकू राजगुरूने साकारली आहे. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.