हृता दुर्गुळेनं 'ठरलंय फॉरेव्हर' नाटकासाठी दगडूशेठ बाप्पाकडे मागितला आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:00 IST2025-09-30T18:59:46+5:302025-09-30T19:00:03+5:30
Hruta Durgule : अलिकडेच हृता दुर्गुळेचा 'आरपार' हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर आता ती लवकरच नाटकात पाहायला मिळणार आहे.

हृता दुर्गुळेनं 'ठरलंय फॉरेव्हर' नाटकासाठी दगडूशेठ बाप्पाकडे मागितला आशीर्वाद
अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule)ने मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. अलिकडेच तिचा आरपार हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर आता ती लवकरच नाटकात पाहायला मिळणार आहे. 'ठरलंय फॉरेव्हर' असं तिच्या नाटकाचं नाव असून ती या नाटकाची सहनिर्मातीदेखील आहे. नुकतेच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी 'ठरलंय फॉरेव्हर' या नाटकाच्या पहिल्या तिकिटाचं पूजन करण्यात आलं. यावेळी नाटकाची नायिका आणि सह-निर्माती हृता दुर्गुळे स्वतः उपस्थित राहिली. हृतासोबतच निर्माते ऋषी मनोहर आणि कपिल रेडेकर, तसेच नाटकाच्या टीममधील सदस्यांनी गणरायाच्या चरणी माथा टेकवत नाटक यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद मागितला.
यावेळी हृता दुर्गुळे म्हणाली की, '''ठरलंय फॉरेव्हर'च्या प्रवासाची सुरुवात गणरायाच्या कृपाशिर्वादाने करणं, आणि प्रत्येक नवीन प्रवासात गणरायाचा आशीर्वाद मिळणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.'' लवकरच रंगभूमीवर येणारं हे नाटक तरुणाईच्या भाषेत आणि नव्या धाटणीच्या प्रयोगातून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे.
गेल्या दशकभर रंगभूमीवर सतत नवे प्रयोग करणाऱ्या ऋषीसमोर आता स्वतःचं नाटक आणण्याचं मोठं आव्हान आहे. 'ठरलंय फॉरेव्हर'या नाटकात द्विभाषिक संवाद, लाइव्ह म्युझिक आणि तरुणाईची बोली अशा प्रयोगांचा संगम दिसणार आहे. ''मी पारंपरिक चौकटीत बसणारं नाटक करायचं नाही असं ठरवलं होतं. हे नाटक धाडसी आहे आणि थेट तरुणाईच्या भाषेत संवाद साधतं,'' असं ऋषी मनोहर सांगतो. ऑक्टोबरमध्ये हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.