"महाराष्ट्राची पुढची पिढी ही 'शिवबा' की 'सिवबा' सांगणार?" हिंदीकरणावर हेमंत ढोमे भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:26 IST2025-07-11T12:26:00+5:302025-07-11T12:26:27+5:30
त्रिभाषा समितीला हेमंत ढोमेचा विरोध, म्हणाला...

"महाराष्ट्राची पुढची पिढी ही 'शिवबा' की 'सिवबा' सांगणार?" हिंदीकरणावर हेमंत ढोमे भडकला
Hemant Dhome Marathi Hindi Langauge: महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी सक्ती करण्याच्या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद पेटला आहे. सक्ती मागे घेण्यात आली असली तरी त्रिभाषाच्या सूत्रांच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेणार आहे. सरकारने नेमलेली ही समिती नव्या पद्धतीने हिंदीसक्ती आणेल असा संशय मराठीप्रेमी घेत आहे. त्यामुळे या समितीला कडाडून विरोध होत आहे. यावर अभिनेता, दिग्दर्शक आणि मराठी भाषेचा प्रखर समर्थक हेमंत ढोमे याने हिंदीकरणावर जोरदार टीका करत एक महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला आहे.
हेमंत ढोमे X वर (पूर्वीचे ट्विटर) खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. त्याने लिहलं, "महाराष्ट्राची पुढची पिढी आता दिवाळीत किल्ले बनवणार आणि त्यावर कोण विराजमान झालंय असं विचारल्यावर ती लेकरं काय सांगणार? 'शिवबा' की 'सिवबा' ??? याचा विचार जरूर करा आणि मग शालेय शिक्षणाच्या हिंदीकरणाला पाठिंबा द्या! लेकरांना आधी 'मराठी' नीट शिकवा", असं त्यानं म्हटलं. तसेच मराठी अभ्यास केंद्राच्या सर्व मागण्या पुर्ण व्हाव्यात, अशीही मागणी केली आहे.
महाराष्ट्राची पुढची पिढी आता दिवाळीत किल्ले बनवणार आणि त्यावर कोण विराजमान झालंय असं विचारल्यावर ती लेकरं काय सांगणार?
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) July 7, 2025
‘शिवबा’ की ‘सिवबा’ ???
याचा विचार जरूर करा आणि मग शालेय शिक्षणच्या हिंदीकरणाला पाठिंबा द्या!
लेकरांना आधी ‘मराठी’ नीट शिकवा! @AbhyasKendra च्या सर्व… pic.twitter.com/GapEuqT14m
हेमंतनं पोस्टच्या अखेरीस त्यानं स्पष्ट"खाली बालिश बुद्धी वापरून लगेच शिवबा काय म्हणतो वगैरे अक्कल पाजळू नये… मुद्दा बालवयाचा आणि बालमनाचा आहे", अशी तळटीपही दिली. #मराठी_भाषा, #समिती_नकोच, #मराठीशाळा हे हॅशटॅग त्याने दिले. दरम्यान, महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. यातून खटके उडाले आहेत आणि मारहाणीच्या घटनादेखील घडल्या.