"मुक्तपणे बोलण्याची भीती वाटू लागलीय" कुणाल कामरा प्रकरणात मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:12 IST2025-03-28T14:12:34+5:302025-03-28T14:12:48+5:30
कुणाल कामराप्रकरणात मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत मांडलं.

"मुक्तपणे बोलण्याची भीती वाटू लागलीय" कुणाल कामरा प्रकरणात मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत
Girija Oak On Kunal Kamra Eknath Shinde Controversy : कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. कुणाल कामरा याने मुंबईतील एका शोमध्ये "गद्दार नजर वो आए..." या विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्यावर टिप्पणी केली. यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी थेट ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये जाऊन तोडफोडही केली. सध्या हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. यानंतर अनेक स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी अभिनेत्री गिरिजा ओकने (Girija Oak) रोखठोक मत मांडलं आहे.
गिरिजा ओकला 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत "पुर्वी नाटकांमधून लोकांवर काही संस्कार व्हायचे. नाटकं ही कधी-कधी कुणाचं आयुष्य बदलून टाकणारी होती. आता हल्लीच्या नाटकांनी समाज बदलतो का? की फक्त मनोरंजन हेच त्यामागे आहे" असा प्रश्न केला. यावर ती उत्तरात म्हणाली, "याचं उत्तर हे सरकट हो किंवा नाही असं नाही. कलेने प्रबोधन होते का? तर कदाचित होऊ शकते. पण, प्रबोधनाचा सर्व भार हा कला आणि कलाकारावर टाकावा का? मला वाटतं जे काही सुरू आहे. ते सहन करण्याची क्षमता आपल्याला कलेतून, मनोरंजनातून मिळते".
"काही तरी पाहिल्यावर आपलं मन हलकं होतं. आता मी जे नाटक करतेय. त्यात एक वाक्य आहे की क्या लगता है तुम्हें कला और कलाकार दुनिया के सारे युद्ध खत्म कर सकते है? तर तो मुलगा म्हणतो की समाप्त तो नहीं कर सकते लेकिन वो सहने की ताकत दे सकते हैं. तर मला वाटतं कलेकडे तशा पद्धतीने बघावं. जे आपल्याला साध्य नाही करता येत, ते कलेच्या माध्यमातून साध्य करता येते. आपण बुद्धीजीवी प्राणी आहोत. त्यामुळे भावनांंना मोकळं करण्याचा एक मार्ग असला पाहिजे. मग ते तुम्ही स्वत: करा, किंवा दुसरं कुणी केललं पाहा. परिणाम तोच असतो. मी माझ्या भुमिकेतून एका अशा व्यक्तीमत्त्वाला वाचा देते, जे लोकांना करायचं असतं. पण, ते त्यांना बोलता येत नाही. मग लोकांना ते पाहिल्यावर असं वाटतं की मलाही हेच बोलायचं होतं. प्रेक्षक त्या पात्राशी जोडले जातात".
"सगळं समाज प्रबोधन कलाकार करतात का तर नाही. नाटक आणि चित्रपटात जे घडत आहे, ते समाजाचा आरसा आहे काय़ तर काही प्रमाणात हो. नाटक आणि चित्रपटात जे घडतंय समाज त्याचा आरसा आहे का? तर काही प्रमाणात तेही खरं आहे. पण, हो किंवा नाही असं काही नाहीये. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एक पत्ता पडला की सर्व कोसळतं, तसं काहीसं आता व्हायरलिटीमुळे झालं आहे. मग असं होतं की काही बोलावं की नाही. आपली मतं मांडावी की नाही. जर मतं मांडायला भीती वाटतं असेल तर ही एक समस्या आहे. तसं नसायला हवं. जर तुम्हाला एखादं मत पटत नाही. तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता किंवा निषेध व्यक्त करु शकता.
पुढे तिनं म्हटलं, "आता एका ठिकाणाची तोडफोड केली आणि आणि त्यांनी असं सांगितलं की, आम्हाला आता सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत आम्ही ती जागा पुन्हा सुरू करणार नाही. तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी एका कॉमेडियनने जोक केला आणि मग एका संस्थेने त्यांच्यावर हल्ला केला. हे सगळं दुर्दैवाचं आहे. मी असं म्हणत नाही की, तुमच्या भावना कशा दुखावल्या गेल्या. भावना दुखावल्या असतील, त्या भावना आहेत. भावना दुखावल्या… नाही दुखावल्या… तर त्यांची ती वैयक्तिक अभिव्यक्ती आहे. पण एखाद्या जागेची तोडफोड करावी हे उत्तर आहे का? हे प्रत्येकालाच विचारलं पाहिजे. आता यावर कमेंट्स येणार आणि लोक बोलणार. पण मला खरंच असं वाटतं की, अशा वास्तूची तोडफोड करणे, जिथे कला सादर करता येते, तुम्हाला खरंच योग्य वाटतं का? ही विचार करण्याची गोष्ट आहे"
ती म्हणाली, "बोलताना एक प्रकारचं भान असलं पाहिजे. पण, त्याचा सरसकट काही कायदा नाही. भान म्हणजे काय? त्याची सीमा काय? तुम्ही कशाला योग्य आणि कशाला अयोग्य म्हणताय? हे इतकं वैयक्तिक झालं आहे की एखाद्या व्यक्तीला वाईट वाटलं तर त्याने हाणामारी केली आणि संपला विषय... तर काय करणार? याचा कोणत्या कोर्टात जाऊन न्याय मागणार? कशामुळे, कुठे भावना दुखावली जाते, या गोष्टीला तुम्हा कसा न्याय देणार?".
"एखादी व्यक्ती म्हणेल तो जोक होता. तुम्हाला वाईट वाटलं तर मी काय करु? राजकीय जोक होता, सांगून करतोय. आपल्याकडे वर्षानुवर्षे राजकीय गोष्टींवर उपहासात्मक जोक केले जात आहेत. आचार्य अत्रेंपासून हे सुरू आहे. ज्यांच्यावर जोक केले जायचे, ते नेते प्रेक्षकांमध्ये बसून हसायचे. पण, आता भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि तोडफोड झाली. आपण भावना दुखावली जाऊ शकत नाही, असं म्हणून शकत नाही. मी योग्य-अयोग्य निर्णय कसा घेणार. मी जे बोलले ते बोलले. तुला ते आवडलं नाही. हा इतका गडबडीचा विषय आहे की त्याबद्दल न्यायानिवडा करता येत नाही. त्यामुळे सोपं आहे की गप्प बसा. पण, असं करत गेल्यानं मग हळुहळु मुक्तपणे बोलणं हे धोक्यात येतं", असं तिने म्हटलं.