Funeral Marathi Movie Review: ...आणि मृत्यूचाही व्हावा आनंदसोहळा, जाणून घ्या कसा आहे 'फनरल'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 03:49 PM2022-06-11T15:49:25+5:302022-06-11T15:49:57+5:30

Funeral Marathi Movie Review: जीवनाची सुरुवात जशी आनंदानं होते, तसा शेवटही आनंदी का होऊ शकत नाही या विचारावर आधारलेला लेखक रमेश दिघे यांचा हा सिनेमा फ्युनरल ते फनरलपर्यंतचा प्रवास घडवतो.

Funeral Marathi Movie Review: ... and death should be a celebration, know how 'Funeral' is? | Funeral Marathi Movie Review: ...आणि मृत्यूचाही व्हावा आनंदसोहळा, जाणून घ्या कसा आहे 'फनरल'?

Funeral Marathi Movie Review: ...आणि मृत्यूचाही व्हावा आनंदसोहळा, जाणून घ्या कसा आहे 'फनरल'?

googlenewsNext

कलाकार : आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे 
दिग्दर्शक : विवेक दुबे
निर्माते, लेखक : रमेश दिघे
स्टार - साडे तीन स्टार
चित्रपट परीक्षण संजय घावरे

माणूस जन्माला येतो तेव्हा सर्व आनंदी असतात, पण जातो तेव्हा सर्व दु:खी होतात. मध्यंतरीच्या काळात तो जे भोगतो त्याला जीवन म्हणतात. जीवनाची सुरुवात जशी आनंदानं होते, तसा शेवटही आनंदी का होऊ शकत नाही या विचारावर आधारलेला लेखक रमेश दिघे यांचा हा सिनेमा फ्युनरल ते फनरलपर्यंतचा प्रवास घडवतो. दिघेंनी लिहिलेला विषय तितक्याच तळमळीनं पडद्यावर सादर करण्याचं काम दिग्दर्शक विवेक दुबे यांनी केलं आहे. 'जगू आनंदे, निघू आनंदे'च्या माध्यमातून जणू मृत्यूचाही आनंद सोहळा कसा करता येऊ शकतो हा मंत्र देण्यात आला आहे.

ही कहाणी आहे चाळीत लहानाचा मोठा झालेला हिरा आणि त्याच्या तीन मित्रांची... चाळीत कोणाचाही मृत्यू झाला की त्याच्या अंत्यविधीसाठी हिराचे आजोबा पुढाकार घ्यायचे हे हिरानं बालपणापासून पाहिलेलं असतं. नोकरीसाठी बरेच प्रयत्न करूनही बेरोजगार असलेला हिरा बरेच उद्योग करतो, पण प्रत्येक वेळी अपयशी होतो. एकदा एका तरुणीला तिच्या वडीलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी हिरा आणि त्याचे मित्र मदत करतात. तरुणीनं पैसे दिल्यानं मदतीतूनही त्यांची कमाई होते. आई-वडीलांविना वाढलेल्या हिरावर शेजारच्या मोरे आजींचा जीव असतो. घरगुती लोणच्याच्या व्यवसायासोबतच आपल्या वयाच्या ज्येष्ठांसोबत लाफ्टर क्लब चालवणाऱ्या मोरे आजींचं अचानक निधन होतं. जाता-जाता त्या हिराच्या मनात नव्या व्यवसायाची संकल्पना रुजवून जातात. त्यानंतर हिराचा फ्युनरल ते फनरलपर्यंतचा प्रवास सुरू होतो.

लेखन-दिग्दर्शन : इहलोकीची यात्रा संपवणाऱ्याला त्याच्या इच्छेनुसार निरोप देण्याची संकल्पना चांगली असून, त्या जोडीला इतर बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. सुरुवातीला हसवणारा हा सिनेमा हळूहळू भावूक करतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो.

एका सुरेख संकल्पनेवर आधारलेला आणि मनामनांत चांगले विचार रुजवणारा सिनेमा असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. मृत्यूबाबत कोणी बोलायला मागत नाही. मृत्यू अशुभ मानला जातो, पण या चित्रपटात अशुभालाही कसं शुभ बनवता येऊ शकतं याचं चित्रण करण्यात आलं आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगांद्वारे घडणारे हलके फुलके विनोद, चाळीतील वातावरण निर्मिती, आशयघन संवादलेखन, आश्चर्यचकीत करणारे प्रसंग, जीवनातील कटू सत्य मांडणारे विचार आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटात मृत्यूचंही सौंदर्य खुलवण्यात मदत करतं. हा चित्रपट केवळ मृत्यू आणि अंत्यसंस्कारावर भाष्य करत नाही, तर निसर्ग संवर्धन, नातेवाईकांनी मृत व्यक्तीच्या आवडीचं झाड लावून ते वाढवणं आणि अवयव दानासारख्या बऱ्याच मुद्द्यांनाही स्पर्श करतो. काही ठिकाणी हास्य फुलवतो, तर काही ठिकाणी भावूकही करतो. चित्रपटाची सुरुवात विनोदी पद्धतीनं होते, पण नंतर उत्तरोत्तर गंभीर बनत जातो. त्यामुळं उत्तरार्धात मनोरंजनाचे क्षण फार कमी आहेत. टायटल साँग चांगलं झालं आहे. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, संकलन, कला दिग्दर्शन या गोष्टी चांगल्या आहेत.

अभिनय : हा चित्रपट आरोह वेलणकरसाठी खूप मोठा ब्रेक असून, मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं आहे. हिराचं कॅरेक्टर त्यानं अगदी सहजपणे साकारलं आहे. डीजे बनू पाहणाऱ्या सूर्याच्या रूपात हर्षद शिंदे, इन्श्युरन्स एजंट विनोद बनलेला पार्थ घाटगे आणि फोटोग्राफर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सदाच्या भूमिकेत सिद्धेश पुजारे या तिघांनी रोहनला चांगली साथ दिली आहे. कितीही टेन्शन असलं तरी जीवनाचा आनंद उपभोगण्याचा मंत्र प्रेमा साखरदांडे यांनी वयोवृद्ध मोरे आजींच्या भूमिकेत अधोरेखित केला आहे. आरोहसोबत तन्वी बर्वेची जोडी मिसमॅच वाटली तरी चाळीतील जोड्या अशाच असल्यानं मुद्दाम जुळवण्यात आली आहे. हिराच्या आजोबांची भूमिका विजय केंकरेंनी उत्तमरीत्या साकारली आहे. रुग्णालयातील डेड बॉडींच्या विभागात काम करणाऱ्या कचरूच्या माध्यमातून शाहिर संभाजी भगत जीवनाचं सार सांगतात. सर्वच कलाकारांचा अभिनय कथेला अचूक न्याय देणारा आहे.

सकारात्मक बाजू : सुरेख संकल्पना, प्रसंगानुरुप संवादलेखन, उत्तम अभिनय आणि जनमानसापर्यंत एक चांगला विचार पोहोचवण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न.

नकारात्मक बाजू : मृत्यू हे अटळ सत्य असलं तरी ते नाकारणाऱ्यांना हा चित्रपट आवडणार नाही. मृत्यूला अशुभ मानणारे आणि मसालेपटांच्या प्रेमातील प्रेक्षक याकडे पाठ फिरवू शकतात.

थोडक्यात : आपल्या जीवनाचा शेवट कशाप्रकारे सुखद करता येऊ शकतो हा विचार जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला हा चित्रपट एकदा तरी पहायलाच हवा.

Web Title: Funeral Marathi Movie Review: ... and death should be a celebration, know how 'Funeral' is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.