वडिलांचं ४० वर्षांचं स्वप्न पूर्ण! अभिनेता मयुरेश पेमने दुबईत दाखवला भारत-पाकिस्तान सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:01 IST2025-09-29T11:00:46+5:302025-09-29T11:01:36+5:30
Mayuresh Pem : अभिनेता मयुरेश पेम याने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांचं एक ४० वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण केल्याची माहिती दिली आहे.

वडिलांचं ४० वर्षांचं स्वप्न पूर्ण! अभिनेता मयुरेश पेमने दुबईत दाखवला भारत-पाकिस्तान सामना
मयुरेश पेम (Mayuresh Pem) मराठी कलाविश्वातील अभिनेता आहे. त्याने नाटक, चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकताच तो आशिया कप २०२५मधील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी दुबईत गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील देवेंद्र पेम आणि भाऊ मनमीत पेम होते. त्याने वडिलांना हा सामना दाखवून त्यांचे ४० वर्षांचं स्वप्न पूर्ण केलंय. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
क्रिकेटचे कट्टर चाहते असलेल्या आपल्या वडिलांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना स्टेडियममध्ये पाहण्याची तीव्र इच्छा होती. मयुरेशने सांगितले की, ''एक स्वप्न पूर्ण झाले. माझे वडील क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत आणि स्टेडियममध्ये बसून भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना थेट पाहणे हे त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते. योगायोगाने, माझा दुबईतील शो आणि हा सामना एकाच दिवशी होता – त्यामुळे मी ही संधी गमावू शकलो नाही! मी त्यांना सरप्राईज म्हणून सामन्याची तिकीटं दिली आणि त्यांचे ४० वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण केले. असे क्षण अमूल्य असतात. ''
भारत-पाकिस्तानचा सामना वडिलांसोबत थेट स्टेडियममध्ये पाहण्याचा अनुभव त्याच्यासाठी खूप खास होता. या खास क्षणासाठी तिकीटांची व्यवस्था केल्याबद्दल त्याने अबुधाबी महाराष्ट्र मंडळ आणि विजय माने सरांचे विशेष आभार मानले आहेत. त्याच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.