वंदना गुप्तेंना भेटला अवली फॅन! चक्क फरशीवर घेतली सही, अभिनेत्री म्हणाली- "मला जरा आश्चर्य वाटलं कारण..."
By कोमल खांबे | Updated: October 15, 2025 10:54 IST2025-10-15T10:53:02+5:302025-10-15T10:54:08+5:30
नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंदना गुप्ते यांना एक वेगळाच अनुभव आला. एका चाहत्याने वंदना गुप्ते यांची चक्क फरशीवर सही घेतली. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

वंदना गुप्तेंना भेटला अवली फॅन! चक्क फरशीवर घेतली सही, अभिनेत्री म्हणाली- "मला जरा आश्चर्य वाटलं कारण..."
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आजपर्यंत त्यांच्या अभिनयाने नटलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. सध्या त्या 'कुटुंब कीर्तन' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंदना गुप्ते यांना एक वेगळाच अनुभव आला. एका चाहत्याने वंदना गुप्ते यांची चक्क फरशीवर सही घेतली. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
वंदना गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अवली चाहत्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या चाहत्याने फरशीवर वंदना गुप्ते यांची सही घेतल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत वंदना गुप्ते म्हणतात, "आज ठाण्याला 'गडकरी रंगायतन'ला 'कुटुंब कीर्तन' नाटकाचा प्रयोग होता. मेकअपरूममध्ये एक गृहस्थ माझी सही घ्यायची म्हणून भेटायला आले. त्यांनी एका २ बाय ४च्या टाइलवर माझी सही घेतली. मला जरा आश्चर्य वाटलं म्हणून मी कारण विचारलं".
"ते म्हणाले “गडकरी रंगायतन हे ठाण्याचं वैभव आहे. जिथे अनेक महान कलाकार आपली कला सादर करत आले. त्या रंगमंदिराचे नूतनीकरण करताना मी त्यातल्या फरश्या ३/४ गोणी भरून घरी घेऊन आलो. मी माझ्या आवडत्या कलाकारांची सही ह्यावर घेऊन ठेवतो. माझ्या घराची एक भिंत ह्या सह्यांनी भरलेली असेल. आणि ती माझ्यासाठी एक ऐतिहासिक, मौल्यवान आठवण असेल”. मला खूप गलबलून आलं ते ऐकून. किती प्रेम करतात आमच्या कलेवर लोक. खरं तर असे प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही रंगमंचावर टिकून आहोत. बालगंधर्व उगाच नाही प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत". वंदना गुप्ते यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.