प्रेक्षकांवर मोहिनी घालणार का विजय-कृतिकाची जोडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 08:54 AM2017-09-01T08:54:22+5:302017-09-01T14:24:22+5:30

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक कलाकारांनी जोड्यांच्या रूपात मनोरंजन करीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. केवळ हिंदीतच नव्हे, तर मराठी ...

Do you want to add charm to audience? | प्रेक्षकांवर मोहिनी घालणार का विजय-कृतिकाची जोडी?

प्रेक्षकांवर मोहिनी घालणार का विजय-कृतिकाची जोडी?

googlenewsNext
रतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक कलाकारांनी जोड्यांच्या रूपात मनोरंजन करीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. केवळ हिंदीतच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीतही कृष्णधवल चित्रपटांपासून आजवर नायक-नायिकांनी जोड्यांच्या रूपात रसिकांचं लक्ष वेधून घेत आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेल्या ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १५ सप्टेंबरला आपल्या मनोरंजनासाठी येत आहे.
 
चंद्रकांत पवार दिग्दर्शित ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही जोडी प्रथमच एकत्र आली आहे.या चित्रपटामध्ये पवार यांनी विठ्ठलाच त्याच्या भक्ताशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित  केलं आहे.वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात मुलाची भूमिका साकारण्यासाठी एका नव्या चेहऱ्याची गरज होती. ऑडीशनद्वारे बऱ्याच जणांचा शोध घेतला पण हवा तसा चेहरा दिग्दर्शकांना मिळत  नव्हता. मात्र ओळखीतून विजयचं नाव समोर आलं. विजयच्या रूपात पवार यांना ‘विठ्ठला शप्पथ’चा नायक तर कृतिकाच्या रूपात नायिका सापडली.
 
विजय-कृतिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे.दिग्दर्शकांनी दिलेला विश्वास आणि पडद्यावर आपापल्या भूमिकांना यशस्वीपणे न्याय देण्याचा आत्मविश्वास या बळावर दोघांनीही या चित्रपटात धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. विजयने या चित्रपटात कृष्णाची, तर कृतिकाने नयनाची व्यक्तिरेखा साकारली आहे. कृतिकाच्या गाठीशी कामाचा थोडा अनुभव असला तरी विजय यांनी प्रथमच कॅमेऱ्यासमोर परफॉर्म केलं आहे. पडद्यावर प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री आकर्षित करणारी असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.

दिग्दर्शनासोबतच चंद्रकांत पवार यांनीच या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली असून, कौस्तुभ सावरकर आणि भानुदास पानमंद यांच्या साथीने त्यांनी संवाद लिहिले आहेत. विजय-कृतिका या जोडीसोबत या चित्रपटात मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, केतन पवार, विजय निकम, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांच्याही भूमिका आहेत. राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुवर या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात या चित्रपटातील गीतरचना रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे.

Web Title: Do you want to add charm to audience?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.