....म्हणून चिन्मय मांडलेकरनंतर शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजीत श्वेतचंद्रची निवड केली, अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण
By कोमल खांबे | Updated: January 7, 2026 17:35 IST2026-01-07T17:34:44+5:302026-01-07T17:35:03+5:30
दिग्पाल लांजेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला. मात्र काही कारणांमुळे त्याने शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला. आता दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजीत श्वेतचंद्रची निवड का केली? यामागचं कारण दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं आहे.

....म्हणून चिन्मय मांडलेकरनंतर शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजीत श्वेतचंद्रची निवड केली, अखेर दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवराज अष्टकमधील हे सहावं पुष्प असून या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी आग्र्याची स्वारीचा इतिहास दाखवला जाणार आहे. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' हा सिनेमा आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला. मात्र काही कारणांमुळे त्याने शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'मध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
अखेर या चेहऱ्यावरुन पडदा हटवण्यात आला. आता दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजीत श्वेतचंद्रची निवड का केली? यामागचं कारण दिग्पाल लांजेकरांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, "अभिजीतने आधीच्या ३-४ चित्रपटांमध्ये माझ्यासोबत काम केलंय. त्याची मेहनत, त्याचा प्रामाणिकपणा आणि आमच्या टीमच्या कार्याबद्दलचा त्याचा आदर.... तो आदर नुसता शब्दांतून नव्हे तर त्याच्या कृतीतून व्यक्त होतो. तो डोंबिवलीला राहतो. आणि पुण्यात रिहर्सलला येण्यासाठी त्याला जवळपास दोन-अडीच तास लागतात".
"शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास १०-१२ लूक टेस्ट झाल्या. Aiच्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही आम्ही त्याचं चित्र काढून घेतलं होतं. दाढी-मिशी यासगळ्या सकट त्याच्या लूकटेस्ट पुणे-मुंबईत झाल्या. या सगळ्याला न चुकता, न कंटाळता तो हजर होता. याशिवाय अभिनेता म्हणून तो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. काय पद्धतीने तो अभिनय करतोय हे आम्ही पाहिलं. त्याचं व्हॉईस ट्रेनिंग झालं. त्यालाही तो दोन महिने उपस्थित होता. हे सगळं तो घरदार सोडून, चालू असलेल्या मालिकेतून वेळ काढून करत होता. आणि एका क्षणाला त्याने मालिका सोडून दिली. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेला त्याने जे महत्त्व दिलं त्यासाठी स्वाभाविकपणे त्याची निवड केली गेली", असंही दिग्पाल लांजेकर म्हणाले.