महाराष्ट्रातील नाटयगृहांची परिस्थिती बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 17:58 IST2016-11-23T17:58:07+5:302016-11-23T17:58:07+5:30

  बेनझीर जमादार                 महाराष्ट्रातील नाटयगृहांच्या परिस्थितीबाबत वारंवार शासनाकडे मागणी करूनही कलाकारांच्या ...

The conditions of the theater in Maharashtra are difficult | महाराष्ट्रातील नाटयगृहांची परिस्थिती बिकट

महाराष्ट्रातील नाटयगृहांची परिस्थिती बिकट

  बेनझीर जमादार

               
महाराष्ट्रातील नाटयगृहांच्या परिस्थितीबाबत वारंवार शासनाकडे मागणी करूनही कलाकारांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकताच नाटयगृहांच्या दुरव्यवस्थाविषयीचा एक व्हिडीओ अभिनेता सुमीत राघवन याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यानंतर सगळीकडून नाट्यगृहांबाबत प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले. याच नाटयृहांविषयी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे काय मत आहेत हे लोकमत सीएनएक्सने जाणून घेतले आहेत. 



राजन भिसे - महाराष्ट्रात हाताच्या बोटावर सोडले की, एक ही असे नाटयगृह नाही की जे सध्या श्वास घेत आहेत. साधे रंगभूमीवरदेखील बेसिक सुविधा उपलब्ध नाही. मध्यंतरी शासनाने नाटयगृहांसाठी समिती निवडली, आढावा घेतला मात्र त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहिती नाही. आता हेच पाहा ना, डोंबिवली येथील थिएटर अवाढव्य बांधून ठेवले आहे. ते आता मेंटेन करण्यासाठी यांच्या नाकी नऊ येत आहे. निदान हे बांधण्यासाठी ज्या लोकांना यातील माहिती आहेत त्यांच्याशी बोलून चर्चा करून त्यांचे मत तरी घ्यावे. मात्र आपल्याकडे तसे होत नाही थिएटर डिझायनर विदेशातील डाटाचा वापर करुन इथली थिएटर बांधतात आणि अशा परिस्थितींना कलाकारांना सामोरे जावे लागते.



विनय येडेकर - आपल्याकडे काही नाटयगृहे सोडली तर सर्वच नाटयगृहाची परिस्थिती महाभयंकर आहे. आता, हेच पाहा ना, रविंद्र नाटयगृह हे देखील शासनाचे आहे. या नाटयृहांच्या ठिकाणी पाच ते दहा मिनिटे थांबणदेखील फार कठीण असते. शासनाकडे कलाकारांच्या फार काही अपेक्षा नाहीत. फक्त मेकअप रूम आणि स्वच्छता गृह हे चांगले असावे एवढीच मागणी आहे. परंतु यासंबंधीदेखील शासनाकडे वांरवार मागणी केली आहे. तरी शासन फक्त आश्वासने देत आहेत. त्यांची ही सर्व आश्वासने केवळ पोकळ ठरली आहेत. 



विजय केंकरे - सुमित राघवनने केलेल्या पोस्टशी मी शंभर टक्के सहमत आहे. महाराष्ट्रात कोणती नाटयगृह ही स्वच्छ आणि व्यवस्थित आहे या गोष्टीच्या विचारातच पडावे लागते. रविंद्र, गडकरी, डोबिंवली या नाटयगृहापासून सगळयाच नाटयगृहांची परिस्थिती ही महाभयंकर आहे. जर नाटयगृहांच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी वेतनबाबत अडचण असेल, तर याला नक्कीच पर्यायी मार्ग हा असणारच. मला वाटते की, महानगरपालिकेने त्यांच्या पातळीवर नाटयगृहे स्वच्छ व व्यवस्थित ठेवावीत. म्हणजे या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच मुळातच नाटयगृहांची सुरूवात ही बांधणीपासून होते. त्यावेळीच या समस्येकडे गांभिर्याने पाहाणे आवश्यक आहे. 


                   
प्रशांत दामले - महाराष्ट्रात सर्वच नाटयगृहांची परिस्थिती ही महाभयंकर आहेत. केवळ रसिकांचे नाटकांवर प्रेम असल्यामुळे ते या ठिकाणी येतात. तसेच कलाकारदेखील नाटकांमध्ये काम करण्याची इच्छेपोटी आणि कलेवर प्रेम असल्यामुळे ते या ठिकाणी आपली कला सादर करत असतात. मला असे वाटते की, इतरांप्रमाणे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ते तितकेच प्रत्यक्षात आणणेदेखील गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, गेली दोन वर्ष दुष्काळ परिस्थितीमुळे नाटयगृहाकडे लक्ष देता आले नाही. पण यापुढे नक्कीच नाटयगृहांच्या समस्यांमध्ये लक्ष घालणार आहे.

Web Title: The conditions of the theater in Maharashtra are difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.