"रितेश देशमुखला म्हणू शकतात का असं? मला ग्रुपनं बाजूला केलं", 'गाढवाचं लग्न'मधील गंगीची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:34 IST2025-08-18T11:33:57+5:302025-08-18T11:34:55+5:30
Rajashree Landge : राजश्री लांडगे हिने नुकतेच एका मुलाखतीत तिला इंडस्ट्रीतल्या ग्रुपने बाजूला केलं, अशी खंत व्यक्त केली.

"रितेश देशमुखला म्हणू शकतात का असं? मला ग्रुपनं बाजूला केलं", 'गाढवाचं लग्न'मधील गंगीची खंत
'गाढवाचं लग्न' चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला आहे, तरीदेखील या सिनेमाचं कथानक आणि पात्र रसिकांच्या मनात घर करुन कायम आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारली होती. तर राजश्री लांडगे (Rajashree Landge) हिने त्यांच्या पत्नीची म्हणजे गंगीची भूमिका साकारली होती. राजश्री सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने एका मुलाखतीत तिला इंडस्ट्रीतल्या ग्रुपने बाजूला केलं, अशी खंत व्यक्त केली.
अभिनेत्री राजश्री लांडगेचे आजोबा कर्मवीर मारुतीराव लांडगे राजकारणी तर वडील पाटबंधारे खात्यात सचिव आहेत. अभिनेत्री सध्या इंडस्ट्रीतून गायब असून तिने समाजकारण, राजकारणाची वाट धरली आहे. अभिनेत्रीने फिल्मी मराठीला दिलेल्या मुलाखतीत खंत व्यक्त केली. ती म्हणाली की, मराठी सिनेइंडस्ट्रीतील ग्रुपने मला कायम बाजूला ढकललं. 'तुम्ही काय बाबा राजकीय, तुमच्याकडे जमिनी, शेती असेल... इथे आम्हाला काम करू दे, तुमचं काय?' मग हे तुम्ही रितेश देशमुखला म्हणू शकता का असं? तो माझ्याच समाजाचा आहे, ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्याचा मुलगा. रितेशपेक्षा या इंडस्ट्रीत असं कोण मोठं आहे? कोण आहे मोठं! आम्हाला त्याचं प्रचंड भूषण आहे, कशाला लाज वाटली पाहिजे? तुम्ही त्यांना सांगू शकता का, 'तुमच्याकडे सगळंच आहे तुम्ही कशाला इंडस्ट्रीत काम करता' त्यांचं बॅकग्राउंड कितीही मोठं असू दे. शेवटी त्यांचं वागणं, काम करणं यामुळेच ते लोकप्रिय आहेत ना.
''मी साकारलेली 'गंगी' भावली नसती...''
ती पुढे म्हणाली की, बॉलिवूडमध्ये ते फक्त मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून प्रसिद्ध आहेत का? त्यांचं चांगलं वागणं,चांगलं काम करणं हे तुम्ही काढून नाही घेऊ शकत. तसंच मी साकारलेली 'गंगी' भावली नसती, केवळ माझ्या बॅकग्राउंडमुळे मी गाजू शकले असते का? हे सगळं खोटं आहे, हा ज्याचा त्याचा स्ट्रगल आहे, तुम्ही कामावर बोला. कॅमेऱ्याला माहीत नाही की राजश्री लांडगे कोणाची मुलगी आहे, कॅमेऱ्याला दिसत नाही की रितेश देशमुख कोणाची व्यक्ती आहे त्याला फक्त अभिनय दिसतो आणि ती भूमिका दिसते."