अवधूत गुप्तेचं पहिलंवहिलं रॅप सॉंग आले हो......एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 16:33 IST2020-12-23T16:33:15+5:302020-12-23T16:33:47+5:30
मराठी गाण्यांमध्ये नवनवीन प्रयोग करणारा हा प्रसिद्ध गायक, त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा गाण्याचा एक नवीन प्रकार घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. अवधूत गुप्ते त्याच्या चाहत्यांसाठी एक रॅप सॉंग घेऊन आला आहे.

अवधूत गुप्तेचं पहिलंवहिलं रॅप सॉंग आले हो......एकदा पाहाच
गायक, संगीत दिग्दर्शक. दिग्दर्शक, प्रस्तुतकर्ता, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याच्या रॉक सॉंग, प्रेमगीतांनी, कव्वालीने एकंदरच जल्लोषमय गाण्यांनी प्रत्येकालाच थिरकायला लावले. मराठी गाण्यांमध्ये नवनवीन प्रयोग करणारा हा प्रसिद्ध गायक, त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा गाण्याचा एक नवीन प्रकार घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. अवधूत गुप्ते त्याच्या चाहत्यांसाठी एक रॅप सॉंग घेऊन आला आहे. समीर सामंत यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले असून विक्रम बाम यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे.
अवधूत गुप्तेच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे रॅप सॉंग सुद्धा तितकेच उत्स्फूर्त आहे. हे गाणे रसिकांना थिरकवण्याबरोबरच विचार करायलाही भाग पाडणारे आहे. अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय या गाण्यात उत्तमरित्या आणि कोणाच्याही भावना न दुखावता हाताळण्यात आला असून त्यात माणूसकी हीच खरी जात हा एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.
रॅप साँगची कल्पना कशी सुचली याबाबत अवधूत गुप्ते सांगतो, ''आजवर मी गाण्यांचे विविध प्रकार हाताळले, चित्रपट, कॉन्सर्ट केले. परंतु काहीतरी राहून गेल्याचे सतत जाणवत होते आणि त्यातूनच मग या रॅप सॉंगची संकल्पना सुचली.
अनेकांना वाटत असेल, की रॅप सॉंगसाठी असा ज्वलंत विषय का निवडला? तर आज आपण कितीही म्हटले, तरी अनेकदा हा मुद्दा डोकं वर काढतोच. समाजात इतर जातींपेक्षा माणूसकी ही एकच जात जास्त महत्त्वाची आहे, हे सांगण्याचा प्रांजळ प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.'' अवधूत गुप्तेचे हे रॅप सॉंग संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल!