"त्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे मला 'शिवसेनेचा अवधूत' म्हणू लागले..."; अवधूत गुप्तेने सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:35 IST2025-07-21T13:33:56+5:302025-07-21T13:35:11+5:30
अवधूत गुप्तेचं राजकीय कनेक्शन आलं कुठून याचा किस्सा नुकताच त्याने सांगितला आहे.

"त्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे मला 'शिवसेनेचा अवधूत' म्हणू लागले..."; अवधूत गुप्तेने सांगितला भन्नाट किस्सा
मराठी संगीतकार अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) अनेक हिट गाणी दिली आहेत. 'जय जय महाराष्ट्र','ऐका दाजिबा','मेरी मधुबाला','हळू हळू चाल' अशा अनेक सुपरहिट गाण्यांचा यात समावेश आहे. अवधूत गुप्तेचं राजकारणशीही कनेक्शन आहे. शिवसेनेसाठी त्याने लिहिलेलं 'शिवसेनाssशिवसेनाss' गाणं प्रचंड गाजलं. तसंच इतरही पक्षासाठी त्याने प्रचार गाणी बनवली. अवधूत गुप्तेचं हे राजकीय कनेक्शन आलं कुठून याचा किस्सा नुकताच त्याने सांगितला आहे.
'सर्व काही'या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्तेने बाळासाहेब ठाकरेंसोबतची एक आठवण सांगितली. तिथूनच त्याचं राजकीय कनेक्शन आल्याचंही तो म्हणाला. अवधूत सांगतो, "ऐका दाजिबा गाणं हिट झालं. त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ओळख झाली. महाराष्ट्राला फार मोठा माणूस लाभला. मी त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो. मला त्यांचं दर्शन मिळालं. ठाण्यावर त्यांचं भयंकर प्रेम होतं. तर त्यांनी मला गाणं करायला सांगितलं. 'शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना' असं मी त्यांच्यासाठी गाणं केलं. नंतर मी कधीही मातोश्रीवर त्यांना भेटायला गेलो की मी आतमध्ये आल्या आल्या ते लांबूनच मला बघायचे. माझ्याकडे बघून म्हणायचे, 'शिवसेनेचा अवधूत, अवधूतची शिवसेना' असं ते स्वत: गायचे. खूपच गोड, अत्यंत मोठ्या हृदयाचा प्रेमळ माणूस."
अवधूतचं 'सांग आई' हे गाणं नुकतंच रिलीज झालं. यामध्ये स्वप्नील जोशीची लेक मायराने अभिनय केला आहे. अवधूतला 'रॉकस्टार'असंही म्हणतात. त्याने 'झेंडा','मोरया' या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा तो निर्माता आणि परीक्षकही आहे.