दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:11 IST2025-10-20T14:10:46+5:302025-10-20T14:11:52+5:30
लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत पोहोचल्यात.

दिवाळीत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे, शेअर केला व्हिडीओ
Ashwini Bhave Visits Ayodhya: अयोध्येतील दिवाळी म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा भव्य संगम आहे. भगवान श्रीरामांच्या जन्मभूमीत साजरी होणारी ही दिवाळी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. हजारो दिव्यांनी उजळलेली अयोध्या जणू स्वर्गीय तेजाने न्हाऊन निघालेली नगरी वाटते. हे दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून भक्त अयोध्येकडे धाव घेतात. लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे आपल्या आईसह दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत पोहोचल्यात.
अश्विनी भावे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, "एक मजेशीर गोष्ट शेअर करतेय. मी माझ्या आईला आणि आईच्या मैत्रिणीला घेऊन अयोध्येला राम मंदिराचं दर्शन घ्यायला आले आहे. इकडे विमानतळावर मला इतकी मराठी माणसं, मराठी प्रेक्षक मिळाले की, त्यांना पाहून मला आनंदाचं भरतं आलं. मराठी माणसं, मराठी प्रेक्षक आम्हा मराठी कलाकारांवर किती प्रेम करतात याचं हे उदाहरण आहे. आम्ही सगळ्यांनी राम मंदिराचं दर्शन आणि अयोध्या नगरीचं उत्तम दर्शन घेतलं. मराठी माणसं कुठेही भेटली तरी त्यांचं प्रेम असं ओसंडून वाहतं. जय श्रीराम". अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
अश्विनी भावे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या गेल्या वर्षी 'घरत गणपती'मध्ये दिसल्या. यामध्ये त्यांनी भूषण प्रधानच्या आईची भूमिका साकारली जी सर्वांना आवडली. तसंच त्यांचा 'गुलाबी' हा सिनेमाही गेल्यावर्षीच आला. अश्विनी भावे यांनी करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं आणि त्या अमेरिकेला गेल्या. नंतर घर संसारात रमल्या. सध्या अमेरिकेत वास्तव्याला असतात. कौटुंबिक भेटी आणि शुटिंगनिमित्त त्या महाराष्ट्रात येत असतात. आता त्या पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.