रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य : अशोक सराफ; संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 05:48 AM2024-02-29T05:48:04+5:302024-02-29T05:48:13+5:30

प्रथम महाराष्ट्र भूषण आणि आता संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळणे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो... - सराफ

Ashok Saraf has Sangeet Natak Akademi Award announced | रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य : अशोक सराफ; संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित

रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य : अशोक सराफ; संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नवी दिल्लीतील नॅशनल अकॅडमी ऑफ म्युझिक, डान्स व ड्रामाच्या वतीने अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर 
झाला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधत अशोक सराफ यांनी ‘लोकमत’शी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना मायबाप रसिकांचे मनापासून आभार मानले.

प्रथम महाराष्ट्र भूषण आणि आता संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळणे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो... माझ्याकडे आता भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ५० वर्षांच्या माझ्या कारकिर्दीची या निमित्ताने दखल घेऊन हा पुरस्कार घोषित झाला 

ही माझ्या दृष्टीने खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. अभिनयातील हा मोठा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी सुखद धक्का आहे. रसिकांनी केलेल्या प्रेमामुळेच हा मिळाला आहे. तुम्ही चांगले काम करत आहात, 
असेच काम करत राहा, असे प्रेक्षक आम्हाला म्हणतात म्हणून 
आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून आमचे कर्तव्य ठरते. 

प्रेक्षकांनी समजून घेतल्याने मोठा झालो...
मामा गोपीनाथ सावकार हे माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून जे मिळाले ते रसिकांसमोर सादर केले. त्यांचा आशीर्वाद कायम आहेच, पण धाकटा बंधू सुभाषनेही खूप पाठिंबा दिला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी घरी नसायचो. त्या वेळी संपूर्ण कुटुंब त्याने सांभाळले. 
कौटुंबिक जबाबदाऱ्यांची झळ माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. लग्नानंतर निवेदिताने कुटुंब सांभाळत घराला आकार दिला. या सर्वांचे माझ्या जडणघडणीत खूप मोलाचे योगदान आहे. शेवटी मी हे प्रेक्षकांसाठी केले. त्यांनी मला समजून घेतल्याने मोठा झालो. मी काम करत राहिलो आणि त्यांनी माझ्या कामावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. 
या कलेत एकट्याला कधीच यश मिळत नाही. यात लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार, अगदी बॅकस्टेजला काम करणाऱ्या सर्वांचा सहभाग असल्याने त्यांचाही या पुरस्काराला हातभार लागला आहे.

Web Title: Ashok Saraf has Sangeet Natak Akademi Award announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.