व्हॉट्सअॅप लव्ह या मराठी चित्रपटासाठी आशा भोसले गाणार ‘कॅब्रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:18 IST2018-08-09T17:17:52+5:302018-08-09T17:18:32+5:30

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कॅब्रे आशा भोसले यांनीच गायली आहेत. आता त्या व्हॉट्स अप लव्ह या चित्रपटासाठी कॅब्रे गाणार आहेत.

asha bhosle will sing 'Cabaret' for Marathi film 'Whatsapp Love' | व्हॉट्सअॅप लव्ह या मराठी चित्रपटासाठी आशा भोसले गाणार ‘कॅब्रे’

व्हॉट्सअॅप लव्ह या मराठी चित्रपटासाठी आशा भोसले गाणार ‘कॅब्रे’

हिंदी चित्रपटसृष्टीत एके काळी ‘कॅब्रे’ नृत्य चित्रपटाचा अविभाज्य असायचा. बिंदू, हेलन या नावापाठोपाठ आपोआपच ‘कॅब्रे’ येत असे. मात्र काही काळापासून कॅब्रे जाऊन ‘आयटम साँग’ आले. त्यामुळे गेली काही वर्षं कॅब्रे जणू विस्मृतीतच गेले होते. पण आता रसिकांना एका मराठी चित्रपटामध्ये कॅब्रे नृत्य पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आशा भोसले हे गाणे गाणार आहेत.

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कॅब्रे आशा भोसले यांनीच गायली आहेत. आता त्या व्हॉट्स अप लव्ह या चित्रपटासाठी कॅब्रे गाणार आहेत. व्हॉट्सअॅप लव्ह हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही भाषांसाठी आशा भोसले यांनी कॅब्रे गायले असून मराठी चित्रपटातील गीत अजिता काळेने लिहिले आहे. अजिताने याआधी अनेक चित्रपटांची पटकथा, संवाद लिहिले आहेत. तसेच तिने गीतं देखील लिहिली आहेत. अजिताने लिहिलेले गीत आशा भोसले यांनी गायले असल्यामुळे सध्या अजिता खूपच खूश आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच करण्यात आले.
 
व्हॉट्सअॅप लव्ह या चित्रपटात राकेश बापट आणि अनुजा साठे गोखले यांची मुख्य भूमिका आहे तर आशा भोसले यांनी गायलेले गाणे पल्लवी शेट्टी या अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात येणार आहे. या चित्रपटाला नीतीन शंकर यांनी संगीत दिले असून या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. व्हॉट्सअॅप लव्ह या चित्रपटाची कथा ही हेमंत कुमार महाले यांची असून या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक देखील तेच आहेत.
 
काही वर्षांपूर्वी ‘हॅलो नंदन’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना कॅब्रे नृत्य पाहायला मिळाले होते. गीतकार गुरू ठाकूर याने हे कॅब्रे गीत लिहिले होते. त्या गीताचे बोल हे हिंदी भाषेत होते. या गाण्याला संगीत व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले असून हे गाणे गायिका नीती मोहन यांनी गायले होते. चित्रपटात आदिनाथ कोठारे, मृणाल भगत, अनंत जोग, नीना कुलकर्णी आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Web Title: asha bhosle will sing 'Cabaret' for Marathi film 'Whatsapp Love'