"आणि माझा दिवस आणखी सुंदर झाला...", स्पृहा जोशीने मानले वाढदिवस खास करणाऱ्या चाहत्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:37 IST2025-10-15T11:35:54+5:302025-10-15T11:37:43+5:30
Spruha Joshi : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने तिच्या वाढदिवसाच्या खास क्षणांची माहिती चाहत्यांना दिली आहे.

"आणि माझा दिवस आणखी सुंदर झाला...", स्पृहा जोशीने मानले वाढदिवस खास करणाऱ्या चाहत्यांचे आभार
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने तिच्या वाढदिवसाच्या खास क्षणांची माहिती चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे यंदा अनेक वर्षांनंतर तिला अभिनेता विनोद गायकवाड याच्यासोबत तिचा वाढदिवस साजरा करता आला.
स्पृहा जोशीने तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करताना लिहिले की, ''आजूबाजूला प्रेम करणारी माणसं असली की वाढदिवस आपसूकच खास होतो. कालचा दिवस माझ्या आवडत्या माणसांसोबत निवांत साजरा झाला.'' चाहत्यांनी व्हिडीओ, फोटो आणि मेसेजमधून दिलेल्या शुभेच्छांबद्दल तिने आनंद व्यक्त केला. पण यंदाच्या वाढदिवसाची खास गोष्ट सांगताना ती म्हणाली, ''यंदा बऱ्याच वर्षांनंतर विनोद दादा बरोबर वाढदिवस साजरा करता आला. आदल्याच दिवशी त्याचा वाढदिवस होऊन गेला होता, पण काल 'एका लग्नाची तिसरी गोष्ट'नंतर आम्ही एकत्र सेलिब्रेट केलं.''
चाहत्यांनी आणि स्नेहींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल स्पृहाने कृतज्ञता व्यक्त केली. 'सगळ्यांना वैयक्तिक रिप्लाय देणं शक्य नाही होत त्यासाठी माफ करा, पण तुमच्या शुभेच्छा पोहोचल्या आणि माझा दिवस आणखी सुंदर झाला. लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत होत राहो...' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वर्कफ्रंट
स्पृहा जोशी ही मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासह स्पृहा एक उत्तम कवियित्री आणि निवेदिका देखील आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रामध्ये तिचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. शेवटची ती सुख कळले या मालिकेत पाहायला मिळाली होती. सध्या ती पुरुष या नाटकात काम करताना दिसते आहे.