अलका कुबल यांनी दीड महिन्यात ९ किलो वजन केलं कमी, दररोज न चुकता करतात 'ही' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:06 IST2025-07-17T12:04:41+5:302025-07-17T12:06:16+5:30
अलका कुबल यांनी या वयातही फिटनेसबाबत कमालीची जिद्द दाखवली आहे.

अलका कुबल यांनी दीड महिन्यात ९ किलो वजन केलं कमी, दररोज न चुकता करतात 'ही' गोष्ट
Alka Kubal Weight Loss: अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे त्यांनी सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला. याची साठी ओलांडली असल्याने त्यांच्यात बराच बदल झालाय. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी स्वतःला उत्तमरित्या फिट ठेवले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अलका कुबल यांनी त्यांच्या फिटनेसबाबत काही खास गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी दीड महिन्यांत तब्बल ९ किलो वजन कमी केल्याचं सांगितलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी दीड महिन्यात ९ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला. वाढलेलं वजन आणि त्यातून होणाऱ्या त्रासामुळे वजन कमी करण्याचं ठरवलं. हा प्रवास शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही त्यांच्यासाठी मोठा बदल घडवणारा ठरला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, "साठी पार केल्यावर निवृत्त होण्याची वेळ आहे. आपल्याला कुठे कामं मिळणार असं वाटलं. पण, आता खूप कामांचा ओघ सुरू झालाय. चित्रपट, हिंदी वेब सीरीजमधील भूमिकांसाठी विचारणा झाली. तर त्यामुळे मला असं वाटायला लागलं आता थोडं फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे".
अलका कुबल यांचा २००७ मध्ये अपघात झाला होता आणि त्यानंतर व्यायाम थांबवला होता. यामुळे त्यांचं वजन झपाट्याने वाढलं होतं. त्या म्हणाल्या, "कशाला बारीक व्हायचं, असं वाटायला लागलं होतं. त्यानंतर स्क्रीनवर स्वत:ला पाहिल्यानंतर वाटलं की थोडं वजन कमी करायला पाहिजे. त्यानंतर मी चालणं सुरू केलं. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला जिद्दीने वजन कमी करायचं असेल तर अमुक या गोष्टी करा. त्यानंतर आता मी दररोज ५० मिनिटे चालते. मी दीड महिन्यात ९ किलो वजन कमी केलं. आपल्याला कोणीतरी प्रेरणा देणारं कोणीतरी लागतं. तर माझ्या बाबतीत मला असं वाटतं की आमचे डॉक्टर निमित्त ठरले".
पुढे त्या म्हणाल्या, "मी याआधीही फिटनेसकडे लक्ष दिलं होतं. दोन मुलींनंतरही मी तंदुरुस्त होते. कारण मी तेव्हा नायिकेच्या भूमिका करत होते. मी त्यावेळी वर्षाला १०-१२ सिनेमे करत होते. अपघातामुळे थोडं मागे पडलं होतं".