"त्यांना मला सिनेमात घ्यायचंच नव्हतं...", 'माहेरची साडी' सिनेमाबाबत अलका कुबल यांचा मोठा खुलासा
By कोमल खांबे | Updated: October 21, 2025 13:44 IST2025-10-21T13:43:56+5:302025-10-21T13:44:52+5:30
'माहेरची साडी' हा अलका कुबल यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. पण, या सिनेमासाठी अलका कुबल या पहिल्या पसंत नव्हत्या. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला.

"त्यांना मला सिनेमात घ्यायचंच नव्हतं...", 'माहेरची साडी' सिनेमाबाबत अलका कुबल यांचा मोठा खुलासा
'माहेरची साडी' हा मराठीतील गाजलेला सिनेमा. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तेव्हाही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. 'माहेरची साडी' सिनेमात अलका कुबल मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमाने त्यांना रातोरात स्टार केलं. 'माहेरची साडी' हा अलका कुबल यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. पण, या सिनेमासाठी अलका कुबल या पहिल्या पसंत नव्हत्या. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला.
लाइट्स, कॅमेरा, रियुनियन या लोकमत फिल्मीच्या खास शोमध्ये 'माहेरची साडी' टीमने हजेरी लावली होती. अलका कुबल म्हणाल्या, "विजयजींना सिनेमात मला घ्यायचं नव्हतंच कारण मी आधी सिनेमे केले होते. त्यांना नवीन नायिका हवी होती. किंवा भाग्यश्री पटवर्धन हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी प्रयत्नही केला होता. पितांबर काळे आणि एन एस वैद्य त्यांना सांगत होते की तुम्ही एकदा अलकाला भेटा, अलकाला घ्या, असं ते सांगत होते. विजयजींना नवीन चेहरा हवा होता. नवीन मुलींचे ऑडिशन्सही सुरू होते. मला तेही समजलं होतं. पण, त्यांच्या सांगण्यामुळे विजयजींनी मला भेटायला बोलवलं. पण मी त्यावेळी चौपट मानधन घेत होते. मला माहेरची साडीसाठी चार पटीने कमी मानधन मिळत होतं. मी त्यांना म्हटलं विजयजी मला नाही जमणार. आणि मी तिथून निघाले".
"मला पितांबर काळेंनी थांबवलं. म्हणाले अलका तू हा मूर्खपणा करतेस..खूप मोठी चूक करते. हा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीने होणारे आणि हा तुझ्यासाठी टर्निंग पॉइंट असणारे. माहित नाही पण त्यांना तो कॉन्फिडन्स होता. जसा विजयजींना होता तसाच पितांबर काळेंना होता. कारण ते रोज एकत्र बसून काम करायचे. माझी विजयजींची पहिलीच ओळख होती. आणि खरंच मी पितांबर काळेंच्या शब्दाखातर आत आले आणि मी तो साइन केला. आणि मग फोटोशूट झालं आणि शूटला सुरुवात झाली", असंही त्या म्हणाल्या.