‘अग्निपंख’ - कर्तव्यदक्ष अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 14:32 IST2017-08-28T09:02:46+5:302017-08-28T14:32:46+5:30
आपल्या प्राणाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवणा-या जवानांच्या कहाण्या आपण रुपेरी पडद्यावर पाहिल्या आहेत.देशाच्या सीमांचे रक्षण करणा-या जवानांची ...

‘अग्निपंख’ - कर्तव्यदक्ष अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम !
आ ल्या प्राणाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवणा-या जवानांच्या कहाण्या आपण रुपेरी पडद्यावर पाहिल्या आहेत.देशाच्या सीमांचे रक्षण करणा-या जवानांची गाथा रसिकांना चांगलीच भावली आहे. मात्र आता पहिल्यांदाच अशा जवानांची कथा रुपेरी पडद्यावर येणार आहे जी नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. कुठलीही घटना घडली की पहिल्यांदा त्यांनाच पाचारण करण्यात येते. मग ती आगीची घटना असो किंवा एखादी इमारत कोसळण्याची घटना,किंवा मग एखाद्या पक्ष्याला सुखरुप वाचवणं असो प्रत्येक ठिकाणी हे जवान धावत पोहचतात.हे जवान म्हणजे अग्निशमन दलाचे जवान. अग्निशमन दलाच्या जवानांवर पहिला सिनेमा येत आहे आणि तोसुद्धा मराठीत. या सिनेमाचं नाव 'अग्निपंख' असे आहे. नुकतेच अग्निपंख या सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांवर सिनेमा तयार होत असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु होती. आता या सिनेमाचं पोस्टर पाहून या सिनेमाची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे. विटीदांडू या यशस्वी सिनेमानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा अग्निपंख हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भूकंप असो, महाप्रलय असो, मनुष्य जीवांसह पक्षी आणि प्राण्यांचे जीव वाचवण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान प्रतिकूल परिस्थितीतही करत असतात. ऊन, वारा आणि पाऊस कशाचीही तमा न बाळगता, आपल्या जीवाची पर्वा न करता हे जवान आपलं कर्तव्य बजावत असतात. अग्शिमन जवानांची अग्नि आणि जीव सुरक्षेप्रती असलेली निष्ठा अनेक घटनांमधून समोर आली आहे. अशा कर्तव्यदक्ष अग्निशमन दलाचा संघर्ष एका थरारक आणि रोमांचकारी घटनांमधून रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी रसिकांना अग्निपंख सिनेमाच्या माध्यमातून मिळणार आहे.