आगामी दोन प्रोजेक्ट्सवर चर्चा सुरू, पण सध्या लागलीय गोव्यातील कोंकणी ‘तियात्र’ची ओढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 10:37 IST2025-03-23T10:36:22+5:302025-03-23T10:37:21+5:30

एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल...

Actress Varsha Usgaonkar says she is in talks for two upcoming projects but wants to perform in Konkani theatre again | आगामी दोन प्रोजेक्ट्सवर चर्चा सुरू, पण सध्या लागलीय गोव्यातील कोंकणी ‘तियात्र’ची ओढ!

आगामी दोन प्रोजेक्ट्सवर चर्चा सुरू, पण सध्या लागलीय गोव्यातील कोंकणी ‘तियात्र’ची ओढ!

ते सध्या काय करतात? | वर्षा उसगावकर, अभिनेत्री

आगामी दोन प्रोजेक्ट्सवर चर्चा सुरू असल्याने त्याबद्दल इतक्यात बोलता येणार नाही, पण पुन्हा एकदा कोंकणी थिएटरचे वेध लागले आहेत. कोंकणी थिएटरमधील तियात्र साठी योगदान द्यायचे आहे. तियात्रला जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. तियात्र म्हणजे गोव्यातील ख्रिश्चन बांधवांचे थिएटर. यात आपल्या नाटकासारखीच संहिता असते, पण त्यात गाणीही असतात. गोष्ट, कॉमेडी आणि संगीताचे मिश्रण म्हणजे तियात्र होय. याला ख्रिश्चन बांधवांचा खूप मोठा पाठिंबा असतो. तियात्र त्यांनी खूप मेहनतीने आजही जिवंत ठेवले असल्याचे कौतुक आहे. गोव्यातील मच्छिमारांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण तियात्रला सपोर्ट करत असल्याने आजवर ही नाट्यकला जिवंत राहिली आहे.

मी वयाच्या चौदाव्या वर्षी तियात्र केले होते. त्यात मी गाणेही म्हटले होते हेही आठवते. त्यामुळे तियात्र करण्याची खूप इच्छा होती, पण प्रशांत दामलेंसोबत ‘’सारखं काहीतरी होतंय’’ हे नाटक आणि ‘’सुख म्हणजे नक्की काय असतं’’ ही मालिकाही करत होते. त्यातून वेळ काढणे कठीण जात होते. अर्थात त्यात नक्कीच मी आनंदी होते, पण इतर मनासारखे काही करू शकत नव्हते. आता ते करायचे आहे. लंडन, युरोप, दुबई, बहारीन, दोहा, कतार या देशांमध्ये गोव्यातील ख्रिश्चन बांधव असल्याने तेथे तियात्रचे प्रयोग होतात.  

मला माझे गाणे पुढे न्यायचे आहे. तियात्रमध्ये मी गाणारही असल्याने त्याचा फायदा होईल. अलीकडे गाण्यासाठी खूप विचारणा होत आहे. मी ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गाते. यात स्वत:चीही गाजलेली गाणी असतात. माझ्या तोंडून ती गाणी ऐकायला रसिकांना आवडतात. त्यामुळे गाण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. खूप वाचन करायचे आहे. फिक्शनपेक्षा आत्मचरित्रे आवडतात. ‘’टाटायन’’ या टाटांच्या आत्मचरित्राचे मी जणू पारायणच केले आहे. चार्ली चॅप्लीनचे चरित्र आवडले. आध्यात्मिक वाचन करायलाही आवडते. आयुष्याच्या या वळणावर स्वामी मुक्तानंदांच्या साहित्यासोबतच इतरही संतांचे साहित्य वाचण्यात रमते. माझ्या वडिलांनी मला आध्यात्माची वाट दाखविली.

विविध एनजीओजच्या माध्यमातून भटक्या प्राण्यांसाठी कार्य करते. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनशी जोडले गेले आहे. त्यांच्या सर्व कार्यक्रमांना जाते. काही मुलांच्या पाठीच्या कण्याला आईच्या पोटातच इजा होते. अशा मुलांसाठी कार्य करणाऱ्या स्पायना बायफिडा फाऊंडेशनसाठी काम करते. हे फाऊंडेशन या मुलांवर उपचार करते. ही मुलेही अद्भुत कामगिरी करू शकतात. समाजसेवा करत असतानाच वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि नाटकेही करत राहणार आहे.

Web Title: Actress Varsha Usgaonkar says she is in talks for two upcoming projects but wants to perform in Konkani theatre again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.