'ताठ कणा'मध्ये दिसणार उमेश कामत आणि अभिनेत्री दिप्ती देवी जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:17 IST2025-11-17T13:17:17+5:302025-11-17T13:17:45+5:30
Actor Umesh Kamat and actress Deepti Devi : अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री दिप्ती देवी हे दोन कलाकार 'ताठ कणा' या चित्रपटात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत.

'ताठ कणा'मध्ये दिसणार उमेश कामत आणि अभिनेत्री दिप्ती देवी जोडी
सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन चित्रपटांच्या शोधात असणारे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री दिप्ती देवी हे दोन कलाकार 'ताठ कणा' या चित्रपटात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या 'ताठ कणा’' या आगामी मराठी चित्रपटातून हे दोघे पहिल्यांदाच जोडीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर व ‘स्प्रिंग समर फिल्मस’चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत. उमेश कामत या चित्रपटात डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या भूमिकेत दिसणार असून नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या पत्नीची व्यक्तिरेखा दिप्ती देवी साकारणार आहेत. डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे उमेशने सांगितले. डॉ. रामाणी यांच्या पाठीशी सदैव उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नीची संयमी भूमिका या चित्रपटात मला करायची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे, असे दिप्ती देवीने सांगितले.
धैर्य, चिकाटी, ध्यास आणि प्रयत्न यांचा अनोखा संगम म्हणजे डॉ रामाणी. त्यांच्या या अनोख्या आणि नाट्यपूर्ण प्रवासाची कहाणी म्हणजेच ‘ताठ कणा’. आपलं यश पैशात न मोजता रूग्णाच्या हास्यात समाधान शोधणाऱ्या एका ध्येयवेड्या डॉक्टरची कहाणी म्हणजेच ‘ताठ कणा’ हा चित्रपट. या चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत. 'ताठ कणा' हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.