"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा
By देवेंद्र जाधव | Updated: February 5, 2025 16:45 IST2025-02-05T16:45:28+5:302025-02-05T16:45:57+5:30
सुव्रत जोशीने 'छावा'च्या सेटवरील खास अनुभव सर्वांसोबत शेअर करत आशुतोष राणांसोबतचा किस्सा सांगितलाय (chhaava)

"जोशीsss अशी हाक मारुन बोलवायचे कारण.."; सुव्रतने सांगितला 'छावा'च्या सेटवरील आशुतोष राणांचा किस्सा
विकी कौशलच्या 'छावा' (chhaava) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'छावा' सिनेमात विकी कौशल, (vicky kaushal) रश्मिका मंदाना,(rashmika mandanna) अक्षय खन्ना (akshaye khanna) यांच्यासोबत अनेक मराठी कलाकार सिनेमात पाहायला मिळणार आहेत. 'छावा' सिनेमात 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशीही पाहायला मिळणार आहे. 'छावा'च्या सेटवर सुव्रत जोशीची (suvrat joshi) हंबीरमामांची भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणांसोबत (ashutosh rana) चांगली मैत्री झालेली. सुव्रतने आशुतोष यांच्यासोबतचा खास किस्सा सांगितलाय.
सुव्रतने सांगितला आशुतोष यांच्यासोबतचा खास किस्सा
सुव्रतने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "आनंदाची गोष्ट म्हणजे आशुतोष राणा जे सिनेमात हंबीररावांच्या भूमिकेत आहेत. ते आमचे NSD चे सीनियर आहेत. आम्ही आशुतोष राणांना बघत मोठे झालोय. तुमच्याकडे लूक असतील - नसतील पण केवळ तुमच्यातील अभिनयकौशल्याच्या नावावर तुम्ही स्वतःचं नाव कमवू शकता, हे आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलोय. त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं याचाही आनंद आहे. त्यांच्यासोबत सेटवर गप्पाही झाल्या. त्यांना इतिहासात रस होता. त्यांना काही गोष्टी माहिती होत्या."
"छत्रपती संभाजी महाराजांनंतरचा पेशव्यांचा इतिहास, गाद्या वेगळ्या झाल्या वगैरे.. तो सगळा त्यांना जाणून घेण्याची इच्छा होती. ते फार कुतुहलाने माझ्याशी गप्पा मारायचे. त्यामुळे मी त्यांना सगळा माहित असलेला इतिहास सांगितला."
"अगदी इतिहासाचे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे पडसाद उमटले आहेत, त्यावर आमच्या मोठ्या गप्पा झाल्या. ब्रेकमध्ये ते जोशीss म्हणत मला बोलवायचे. त्यामुळे जसा इतिहास मला आठवत गेला तसा मी त्यांना सांगत गेलो. त्यांचे टपोरे डोळे अजून मोठे करुन माझ्याकडे बघत असायचे. हा मजेदार अनुभव होता." अशाप्रकारे सुव्रतने 'छावा' सिनेमाचा खास किस्सा सांगितलाय. हा सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.