मराठी सिनेमासाठी अभिनेत्याने घटवलं तब्बल ५३ किलो वजन; हाडांचा झाला होता सापळा, कोण आहे तो?
By सुजित शिर्के | Updated: May 9, 2025 17:55 IST2025-05-09T17:51:39+5:302025-05-09T17:55:52+5:30
गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत 'माझी प्रारतना' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

मराठी सिनेमासाठी अभिनेत्याने घटवलं तब्बल ५३ किलो वजन; हाडांचा झाला होता सापळा, कोण आहे तो?
Majhi Prartana Movie: गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत 'माझी प्रारतना' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटआधारित आहे. ही एक संगीतप्रधान कथा असून, प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकारही यात सहभागी आहेत. उद्या ९ मे च्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'माझी प्रारतना' ची टीम सगळीकडे मुलाखती देताना दिसते आहे.
नुकतीच 'माझी प्रारतना' चित्रपटाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पद्माराज राजगोपाल नायर अनेक किस्से शेअर केले. त्याचदरम्यान, या चित्रपटासाठी अभिनेत्याने गोळ्याच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी त्याने जवळपास ५३ किलो वजन घटवल्याचं सांगितलं. त्या दरम्यान अभिनेता म्हणाला, "गोळ्याची भूमिका मी साकारणार आहे, हे ठरल्यावर मी जेवण सोडलं आणि साडे पाच महिने फक्त मी दररोज एक सफरचंद खायचो. दोन चमचे नारळाचं तेल प्यायचो. वजन घटविले तेव्हा माझे वजन ४९ किलो होते. ते सीन शूट झाल्यानंतर मला वजन वाढवायचे होते. ४९ किलोवरून मी १०२ किलो वजन वाढविले. त्यासाठी मग मी जंक फूड, वडापाव, खूप तर्री टाकलेली मिसळ वगैरे खाल्ली आणि वजन वाढविले. मी फिटनेस फ्रिक असल्यामुळे वजन घटवताना त्रास झाला नाही. पण वजन वाढल्यानंतर मला अस्वस्थ वाटत होते."
त्यानंतर सिनेमाबद्दल अभिनेत्याने सांगितलं,"मी वीस वर्षांपासून सिनेमा बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. जर गोळ्याची भूमिका कोणीच केली नसती तर माझे स्वप्न अपूर्ण राहिले असते. तसेच माझ्या विद्यार्थ्यांसमोर मी काय आदर्श ठेवला असता. त्यासाठी मी हे आव्हान स्वीकारले."
एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत "माझी प्रारतना" या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सी.टी. यांनी दिले आहे. "माझी प्रारतना" हा सिनेमा ९ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उपेंद्र लिमयेची या सिनेमात खास भूमिका आहे.